अंनिसने ती ‘धर्म आणि देव यांच्या विरोधात नाही’, असे म्हणणे हीच श्रद्धाळूंची फसवणूक आहे. अंनिसने अंधश्रद्धा निर्मूलनाच्या गोंडस नावाखाली भाविकांच्या श्रद्धानिर्मूलनाचेच कार्य केल्याचे आता उघड होत असल्याने लोकांनी त्यांच्याकडे पाठ फिरवली आहे. – संपादक
पुणे – आम्ही धर्म आणि देव या संकल्पनेच्या विरोधात नाही. (यावरूनच देव ही संकल्पना म्हणणार्यांमध्ये किती अज्ञान आहे, हेच यातून दिसून येते ! – संपादक) राज्यघटनेने प्रत्येकाला देव मानण्याचे आणि धर्माचे स्वातंत्र्य दिलेले आहे; पण देव, धर्म यांना प्रश्न विचारणे हेही आवश्यक आहे; परंतु धर्माच्या, देवाच्या नावावर कुणी बाबा, बुवा, मौलवी फसवणूक करत असेल, ‘माझ्याकडे दैवी शक्ती आहे’, ‘देव माझ्या अंगात येतो’, ‘जादूटोणा, काळी जादू करून तुमचे दु:ख आणि संकट दूर करतो’, असा कुणी दावा करत असेल, तर आमचा त्यांना विरोध आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. हमीद दाभोलकर यांनी केले. ते छत्तीसगड आणि मध्यप्रदेश विज्ञान सभेने आयोजित केलेल्या ‘ज्ञान विज्ञान श्रुंखले’त ‘देशभरात जादूटोणाविरोधात राष्ट्रीय कायदा करण्याची आवश्यकता काय ?’, या विषयावर आयोजित केलेल्या ‘ऑनलाईन’ चर्चासत्रात बोलत होते.
डॉ. हमीद पुढे म्हणाले की,
१. महाराष्ट्रात डॉ. नरेंद्र दाभोलकर हे वर्ष १९९० पासून ‘अंधश्रद्धा निर्मूलन जादूटोणा कायदा’ करण्यासाठी लढत राहिले. अखेर वर्ष २०१३ मध्ये हा कायदा संमत झाला. यामागील संघर्ष मोठा होता, त्यासाठी डॉ. दाभोलकरांचे बलीदान झाले. महाराष्ट्रात आतापर्यंत या कायद्याच्या आधारे ८०० जणांच्या विरोधात तक्रारी प्रविष्ट केल्या आहेत. त्यामध्ये सर्व धर्मांच्या लोकांचा समावेश आहे. (या कायद्याद्वारे हिंदूंच्या धर्माचरणावर गदा येणार होती. याविषयी हिंदुत्वनिष्ठांना जनजागृती करावी लागली. स्वत: अधिवक्ते आणि कायद्याचे जाणकार यांनीच ‘कायद्यातील कलमे भयावह होती’, असे सांगितले. परिणामी ही धर्मविरोधी कलमे काढून टाकण्यास भाग पाडण्यात आले. कायद्यातील कलमांची संख्या २७ वरून १३ एवढी करण्यात आली ! – संपादक)
२. महाराष्ट्र, कर्नाटक येथे झालेला जादूटोणा विरोधातील हा कायदा संपूर्ण देशात व्हायला हवा. (जादूटोणाच्या नावाखाली हिंदूंच्या प्रथा आणि परंपरा यांवर घाला घालणार्या कायद्यांना कडाडून विरोध करणे आवश्यक आहे. – संपादक) त्याकरता सरकारवर दबाव आणला पाहिजे. (डॉ. दाभोलकर प्रकरणात पोलिसांवर दबाव आणून अन्वेषण भरकटवणारी अंनिस आता सरकारवर दबाव आणून धर्मविरोधी कायदे संमत करण्याचा प्रयत्न करणार, याविषयी हिंदुत्वनिष्ठांनी जनजागृती करायला हवी ! – संपादक) जोपर्यंत समाजातून याची मागणी होत नाही, तोपर्यंत राजकीय प्रतिनिधीही याकडे लक्ष देत नाहीत. तुम्ही मध्यप्रदेश आणि छत्तीसगड येथे हा कायदा आणण्यासाठी प्रयत्न करा, आम्ही तुम्हाला हवे ते सहकार्य करतो. (अंनिसचे मनसुबे ओळखून हिंदुत्वनिष्ठांनी वेळीच सावध होऊन धर्माचरणावर गदा आणणारा कायदा न होण्यासाठी संघटितपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे ! – संपादक)