वाशिम येथे भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्या गाडीवर दगडफेक करून शाईही फेकली !

वाशिम – भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांच्या वाहनावर २० ऑगस्ट या दिवशी दुपारी शहरातील बालाजी पार्टिकल बोर्ड कारखान्याजवळ आक्रमण करण्यात आले. हल्लेखोरांनी सोमय्या यांच्या वाहनावर दगडफेक करून शाई फेकली. यामध्ये वाहनाची पुष्कळ हानी झाली आहे. हा कारखाना येथील शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांच्या समर्थकांचा आहे. पोलीस आणि सुरक्षादल यांनी बळाचा वापर करत शिवसैनिकांना आक्रमणाच्या ठिकाणावरून हटवले.

याविषयी किरीट सोमय्या यांनी ‘ट्विटर’वर म्हटले आहे की, हे आक्रमण शिवसेनेच्या गुंडांनी दुपारी १२.३० वाजता केले. या वेळी माझ्या वाहनावर ३ मोठे दगड फेकण्यात आले. वाहनात आमदार राजेंद्र पाटणी, तेजराव थोरात आणि काही ‘सी.आय.एस्.एफ्.’चे सैनिक होते. वाहनांचा ताफा या मार्गाने जाणार, हे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना आधीच ठाऊक होते.