‘छुपे’ तालिबानी !

संपादकीय

स्वरा भास्कर व धर्मांध उर्दू कवी मुनव्वर राणा

सध्या सर्वत्र चर्चिले जाणारे दोनच विषय आहेत, ते म्हणजे ‘तालिबान’ आणि ‘अफगाणिस्तान’ ! तालिबानने नियंत्रण मिळवल्यानंतर अफगाणिस्तानात चालू असणारा हिंसाचार, उन्माद हे समर्थनीय निश्चितच नाही. उलट सर्व देशांनी तालिबानला विरोध करायला हवा; पण दुर्दैवाने तसे झालेले नाही. तालिबान्यांची मोठ्या प्रमाणात बंडखोरी चालू असतांनाही त्याला विरोध होत नाही, याचा अर्थ तालिबानला पाठिंबा देणारे, त्यांचे समर्थन करणारे ‘छुपे’ तालिबानी सर्वत्र पेरले गेले आहेत. ‘छुपे’ तालिबानीच अधिक धोकादायक आणि घातक ठरत आहेत; पण हे ‘छुपे’ तालिबानी नक्की आहेत तरी कोण ? तालिबानी आतंकवाद्यांची तुलना ‘रामायण’ लिहिणार्‍या वाल्मीकिऋषींसमवेत करणारे धर्मांध उर्दू कवी मुनव्वर राणा, तर ‘तालिबानी आतंकवादाप्रमाणे हिंदुत्वनिष्ठ आतंकवादावरही आक्षेप नोंदवायला हवा’, असे ट्वीट करणार्‍या अभिनेत्री स्वरा भास्कर ! यांची ही विधाने पहाता ‘हेच ‘छुपे’ तालिबानी नसतील कशावरून ?’ असा प्रश्न पडतो. एका दरोडेखोराने नकळत घेतलेल्या रामनामामुळे तो महान ऋषि होतो. हीच तर हिंदु संस्कृतीची महानता आहे. ती थोरवी अशांना काय ज्ञात होणार ? ‘वाल्मीकिऋषींची तुलना तालिबानशी केली’, हे ऐकूनच अनेक हिंदूंच्या डोक्यात संतापाची तिडीक गेली असणार ! अशा मुनव्वर राणा यांच्या शेरो-शायर्‍यांना दाद न देता हिंदूंनी त्यांना विरोध करण्यासाठी संघटित व्हायला हवे आणि ऋषिमुनींच्या अपमानाचे वैध मार्गाने प्रत्युत्तर द्यायलाच हवे ! ‘रामायण’ हा हिंदूंचा धर्मग्रंथ लिहिणार्‍या वाल्मीकिऋषींची सर राणा यांच्या शायर्‍यांना काय येणार ? ‘तालिबानपेक्षा अधिक क्रूरता भारतात आहे’, असेही राणा यांचे विधान आहे. ‘स्वरा भास्कर ही बाई भारतात रहातेच कशाला ?’ हा प्रश्न पडतो. स्वरा भास्कर यांना पाकिस्तान, चीन, तालिबान, तसेच आतंकवाद, नक्षलवाद, निधर्मी, पुरो(अधो)गामी, सर्वधर्मसमभाव या गोष्टींचाच जर इतका पुळका आहे, तर त्यांनी खुशाल भारत देश सोडून जावा, नव्हे, अशा भारतद्वेष्ट्यांना खरेतर हाकलूनच द्यायला हवे. भारतात राहून येथील धरतीला न्यून लेखून तालिबानची मान उंचावू पहाणारी ही तालिबानचीच पिलावळ म्हणावी लागेल. अशांपासून सर्व भारतियांनी सावध रहायला हवे. आता तालिबानने अफगाणिस्तान मिळवला, उद्या तालिबान भारतावर आक्रमण करायलाही मागे-पुढे पहाणार नाही. अशा वेळी याच पिलावळी त्यांना जाऊन मिळतील आणि भारतभूमी आंदण म्हणून द्यायचा प्रयत्नही करतील. खर्‍या भारतियांनो, असे आपल्याला कदापि होऊ द्यायचे नाही. ही वेळ ओढावू नये, यासाठी तालिबानप्रेमी पिलावळीला शोधून काढून वेळीच कारागृहात डांबायला हवे. तालिबानने अफगाणिस्तानात कशी सत्ता मिळवली ? इथपासून ते आता तालिबानी काय करत आहेत ? इथपर्यंतचा घटनाक्रम भारतातील सर्वच भाषांतील वृत्तवाहिन्यांनी वेळोवेळी दाखवला, अजूनही दाखवत आहेत; पण ते दाखवतांना वृत्त देण्याची काही प्रसारमाध्यमांची भाषा अगदीच मवाळ, सौम्य आणि तालिबानचा ‘मान’ राखून केली जावी, अशीच असते. अर्थात् तालिबानशी दोन हात कोण करणार ? हिंदु, हिंदुत्व, हिंदु धर्म यांना कसेही, अगदी पायदळी तुडवले, तरी चालते, हिंदू शांतपणे (सहिष्णुपणे) सर्व काही मुकाट सहन करत असतात. त्यामुळे हिंदु धर्माच्या संदर्भात काही घटना घडल्या की, याच काही वृत्तवाहिन्या अन्याय, अत्याचार झाल्याचा आव आणत, कांगावा करत आगपाखड करू लागतात. त्यांचे मथळेही तेव्हा जहाल आणि भडक स्वरूपाचे होतात. ‘हिंदु धर्मावर गरळओक करण्याचा जणू स्वतःला अधिकारच आहे’, अशा आविर्भावात या वृत्तवाहिन्या स्वतःचे घोडे दामटवून हिंदूंना लक्ष्य बनवतात. ‘हिंदु धर्म कसा धोकादायक आहे ? त्यापासून सर्वांनी कसे परावृत्त व्हायला हवे ?’ याविषयी बेंबीच्या देठापासून ओरडून, कंठशोष करून सांगत असतात; पण असा आक्रोश तालिबानच्या संदर्भात केला जात नाही. तेव्हा सगळे मूग गिळून गप्प बसतात, शांतीची कबुतरे उडवली जातात, शब्दांच्या धारदार तलवारीही आपोआप म्यान होतात. यामुळेच भारतद्वेष्ट्यांचे फावते. तालिबानची हिंसक मनोवृत्ती आणि विध्वंसकता, त्यातून विश्वावर होणारे विपरीत परिणाम अन् युद्धाची पडणारी ठिणगी यांविषयी वृत्तपत्रांच्या जोडीला वृत्तवाहिन्यांनीही आवाज उठवावा. शत्रूंपासून रक्षण करून राष्ट्रोत्कर्ष साधण्यासाठी घ्यावयाची योग्य दिशा जनतेला मिळायला हवी. हे दायित्व जितके सरकारचे आहे, तितकेच वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्या यांचेही आहे, हे त्यांनी लक्षात घ्यावे.

हिंदुत्व नष्ट करण्याचे षड्यंत्र !

‘इस्लाम खतरे में है ।’ असे विधान उघडपणे केले जाते; पण सध्याचे गढूळ वातावरण पहाता ‘भारत खतरे में है ।’ असे म्हणण्याचीच वेळ आली आहे. आज भारत आणि हिंदुत्व आहे; म्हणून प्रत्येक भारतीय टिकून आहे. त्यामुळे भारत आणि हिंदुत्व यांचे रक्षण करणे अपरिहार्य अन् अत्यावश्यक आहे. असे असतांनाही ‘हिंदुत्वाचे जागतिक स्तरावर उच्चाटन’ (डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व) या विषयावर विश्वातील ४० हून अधिक हिंदुद्वेष्ट्या विद्यापिठांकडून आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले जाते, याला काय म्हणावे ? हिंदुत्व ही सर्वांचीच आधारशिला आहे; मात्र अशा परिषदेच्या माध्यमातून ही आधारशिला डळमळीत करण्याचे मोठे षड्यंत्र रचले जात आहे. हिंदुत्व नष्ट करण्यासाठी ४० विद्यापिठे काय किंवा संपूर्ण विश्वातील हिंदुद्वेष्टे जरी एकत्र आले, कितीही तालिबानी किंवा आतंकवादी जमले, तरी ते कदापि नष्ट होणार नाही. हिंदु धर्माला हिंसाचाराचा पाया नसून ते स्वतःच्याच तेजाने झळाळत आहेत. त्यामुळे हिंदुत्वावरील आक्रमण उलथवून टाकण्यासाठी हिंदुत्वच खर्‍या अर्थाने सक्षम ठरेल. वेळ आली आहे, ती केवळ छुप्या तालिबान्यांचा सामना करण्याची ! भारत सरकारने अफगाणिस्तानमधील तालिबान्यांच्या कारवायांकडे लक्ष देत असतांनाच भारतातील छुप्या तालिबान्यांचा बंदोबस्त करण्यासाठीही कठोर आणि तत्पर पावले उचलावीत, ही अपेक्षा !