मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना चौकशी समितीकडून २५ सहस्र रुपयांचा दंड !

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी बारमालकांकडून १०० कोटी रुपयांची वसुली केल्याच्या आरोपाचे प्रकरण

मुंबई – महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी बारमालकांकडून १०० कोटी रुपये वसूल केल्याच्या आरोपाचे अन्वेषण करणार्‍या चांदीवाल समितीने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना चौकशीसाठी बोलावूनही ते उपस्थित न राहिल्यामुळे त्यांना २५ सहस्र रुपयांचा दंड ठोठावला आहे.

येत्या ३ दिवसांत हा दंड मुख्यमंत्री साहाय्यता निधीमध्ये जमा करण्याचा आदेश चौकशी समितीने दिला आहे. चौकशी समितीने परमबीर सिंह यांना समन्स पाठवला असून २५ ऑगस्टपर्यंत उपस्थित रहाण्याचा आदेश दिला आहे. अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपयांच्या वसुलीचा आरोप परमबीर सिंह यांनीच केला होता. या प्रकरणाच्या अन्वेषणासाठी महाराष्ट्र शासनाकडून चांदीवाल समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीला सरकारकडून दिवाणी न्यायालयाचे अधिकार देण्यात आले आहेत. यापूर्वीही परमबीर सिंह चौकशीसाठी उपस्थित न राहिल्यामुळे चांदीवाल समितीकडून त्यांना ५ सहस्र रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता.