नाशिक जिल्हा परिषदेच्या महिला शिक्षणाधिकार्‍यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून अटक आणि कारवाईपूर्वी पलायन !

कारवाईपूर्वीच डॉ. वैशाली झनकर वीर यांचे पलायन !

असे लाचखोर शिक्षणाधिकारी विद्यार्थ्यांना नीतीमूल्यांचे शिक्षण काय देणार ? – संपादक

असे अधिकारी असणे शिक्षण विभागाला लज्जास्पदच !- संपादक

डावीकडे डॉ. वैशाली झनकर वीर

नाशिक – जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर वीर यांना एका शिक्षण संस्थाचालकाकडून ८ लाख रुपयांची लाच स्वीकारतांना ठाणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. डॉ. झनकर वीर यांनी संबंधित संस्थाचालकाकडून शाळेसाठी अनुदान संमत करण्यासाठी ९ लाख रुपयांची लाच मागितली होती; पण तडजोडीनंतर ८ लाख रुपये देण्याचे ठरले. लाचेची रक्कम जिल्हा परिषदेतील त्यांच्या वाहनचालकाकडे देण्यास सांगण्यात आले होते. या प्रकरणी संबंधित संस्थाचालकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार प्रविष्ट केली होती. त्यानंतर सापळा रचून वरील कारवाई करण्यात आली.

शिक्षणाधिकार्‍यांनी लाच स्वीकारण्यास सांगितल्याची वाहनचालकाची स्वीकृती !

वैशाली झनकर वीर यांना देण्यासाठी आणलेली लाचेची रक्कम स्वीकारतांना १० ऑगस्टला ठाणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने वाहनचालकाला रंगेहात कह्यात घेतले. याविषयी चालकाकडे चौकशी केल्यावर त्याने शिक्षणाधिकारी झनकर वीर यांच्या सांगण्यावरून लाच स्वीकारली असल्याचे सांगितले. चालकाने वीर यांच्यासमोर याविषयी स्वीकृतीही दिली. विशेष म्हणजे नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला यासंदर्भात कोणतीही माहिती नव्हती. पथकाच्या अधिकार्‍यांनी वाहनचालकासह जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या एका शिक्षकालाही कह्यात घेतले आहे.

पथकाने डॉ. वैशाली झनकर वीर यांच्या घराची झडती घेतली, तेव्हा त्यांच्या नावावर अनुमाने ३ एकर भूमी आणि ४ घरे अशी स्थावर मालमत्ता आढळून आली.

१० ऑगस्टला पथकाने वैशाली झनकर वीर यांना कह्यात घेतले होते; पण कायद्याने सूर्यास्तानंतर महिलेला अटक करता येत नसल्याने त्यांच्या नातेवाइकांना समन्स देण्यात आले. सकाळी त्यांना कह्यात देण्याची हमी घेत त्यांची सुटका करण्यात आली; परंतु झनकर वीर यांनी सकाळीच शहरातून पलायन केले असल्याची माहिती समोर आली. (लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा भोंगळ कारभार ! गुन्हेगार पळून जाण्याची शक्यता आधीच लक्षात घेऊन तसा पोलीस बंदोबस्त का ठेवला नाही ? – संपादक)