१५ ऑगस्टच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाचा ‘मास्क’ विकणारी ई-कॉमर्स संकेतस्थळे आणि दुकाने यांवर कायदेशीर कारवाई करा !

  • केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे निवेदनाच्या माध्यमातून मागणी 

  • हिंदु जनजागृती समितीचा ‘सुराज्य अभियान’ उपक्रम ! 

मुंबई – ‘भारतीय राष्ट्रध्वज’ हा कोट्यवधी भारतियांसाठी अस्मितेचा विषय आहे; मात्र काही अपवाद वगळता त्याचा अन्य कोणत्याही गोष्टींसाठी वापर करणे कायद्याने दखलपात्र आणि अजामीनपात्र गुन्हा आहे. असे असले, तरी ‘रेड-बबल’सारख्या ‘ई-कॉमर्स’ संकेतस्थळांद्वारे, तसेच दुकानांत आणि रस्त्यावर १५ ऑगस्टच्या निमित्ताने भारतीय राष्ट्रध्वजाप्रमाणे बनवलेल्या ‘मास्क’ची मोठ्या प्रमाणात विक्री चालू आहे. संबंधितांवर राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करून कायदेशीर कारवाई करावी, तसेच अशा मास्कची विक्री, उत्पादन आणि वितरण होणार नाही, या दृष्टीने शासनाने तात्काळ योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या ‘सुराज्य अभियान’ उपक्रमाच्या वतीने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की,…

१. राष्ट्रध्वज हे सजावट करण्याचे माध्यम नाही. अशा प्रकारचे मास्क वापरल्यास शिंकणे, त्याला थुंकी लागणे, तो अस्वच्छ होणे, तसेच शेवटी वापरानंतर कचर्‍यात टाकणे इत्यादींमुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होतो आणि असे करणे, हा ‘राष्ट्रीय मानचिन्हांचा गैरवापर रोखणे कायदा १९५०’, कलम २ व ५ नुसार, तसेच ‘राष्ट्र प्रतिष्ठा अवमान प्रतिबंध अधिनियम १९७१’चे कलम २ नुसार आणि ‘बोधचिन्ह व नाव (अनुचित वापरास प्रतिबंध) अधिनियम १९५०’ या तिन्ही कायद्यांनुसार दंडनीय अपराध आहे. तरी शासनाने या कायद्यांची काटेकोरपणे कार्यवाही करावी.

२. मागील वर्षी अरुणाचल प्रदेश सरकारने अशोकचक्र असलेले ६० सहस्र तिरंग्यांचे मास्क विद्यार्थ्यांमध्ये वितरित केले होते. असे करणे ध्वजसंहितेचे उल्लंघन आहे. त्यामुळे केंद्र सरकारने राज्यांना मार्गदर्शक सूचना पाठवावी, तसेच वर्ष २०११ मध्ये या संदर्भातील जनहित याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने ‘शासनाने राष्ट्रध्वजाचा होणारा अपमान रोखावा’ या निर्देशानुसार कार्यवाही करावी.