पुणे येथील गणेश मंडळांना गतवर्षीचाच मंडप परवाना यंदाही ग्राह्य धरण्याचे निश्चित !

पुणे येथील गणेश मंडळ (प्रतिकात्मक छायाचित्र )

पुणे, ९ ऑगस्ट – सध्या शहरावर कोरोनाचे आणि तिसर्‍या लाटेचे सावट आहे. या पार्श्वभूमीवर येणार्‍या गणेशोत्सवाच्या अनुषंगाने ६ ऑगस्ट या दिवशी महापालिकेत अधिकार्‍यांची बैठक झाली. या बैठकीत सरकारच्या आदेशानुसार गतवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सव साधेपणानेच साजरा व्हावा, गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांची गर्दी टाळावी, यासाठी गतवर्षीचाच मंडप परवाना यंदाही ग्राह्य धरण्याचे निश्चित करण्यात आले. त्यामुळे गणेश मंडळांना प्रतिवर्षी घ्यावी लागणारी महापालिका आणि पोलीस प्रशासन यांची अनुमती यंदा घ्यावी लागणार नाही; मात्र अनुमतीसाठी अर्ज करण्याचा पोलिसांचा आग्रह असल्यामुळे पोलीस आयुक्तांशी चर्चा करून याविषयी अंतिम निर्णय होणार असल्याचे महापालिकेतील एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले आहे.

शहरातील गणेश मंडळांना प्रतिवर्षी महापालिका आणि पोलीस प्रशासन यांच्याकडून मंडप आणि इतर परवाने दिले जातात. या परवान्यांसाठी मंडळांच्या कार्यकर्त्यांना महापालिका आणि पोलीस प्रशासनाकडे चकरा माराव्या लागतात. त्यामुळे ‘या परवान्यांसाठी दोन्ही प्रशासनांनी एकत्र येऊन एक खिडकी योजनेद्वारे परवाने द्यावेत’, अशी मागणी प्रतिवर्षी गणेश मंडळांकडून केली जाते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परवान्यासाठी होणारी गर्दी टाळण्यासाठी, कोणत्याही प्रकारची सजावट आणि भव्य मंडप न टाकता गणेशोत्सव साधेपणाने अन् घरच्या घरी साजरा करण्यासाठी गतवर्षी नवीन परवाने न देता जुनेच परवाने ग्राह्य धरण्यात आले होते.