टोकियो ऑलिंपिकमध्ये शेवटच्या दिवशी नीरज चोप्रा यांनी ८७.५८ मीटर एवढ्या लांब भाला फेकून स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले आणि १२१ वर्षांनी भारताला ॲथलेटिक्स या प्रकारात पहिले सुवर्णपदक मिळाले. नीरज यांची ही कामगिरी भारताच्या दृष्टीने ऐतिहासिकच आहे. नीरज यांच्या समवेतचे अन्य विदेशी स्पर्धकांचे भाले नीरज यांच्या अंतराच्या १ मीटर अलीकडेच पडले. नीरज चोप्रा यांची भालाफेकीमध्ये कामगिरी उंचावतच गेली आहे. आशियाई क्रीडा स्पर्धा, राष्ट्रकुल स्पर्धा, ‘ज्युनिअर चॅम्पियनशीप’ या सर्व स्पर्धांमध्ये नीरज यांनी सुवर्णपदकाचाच मान पटकावला आहे. ऑलिंपिकमध्ये मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर, शेकडो देश सहभागी असणार्या, त्यामुळे सर्व जगाचे लक्ष लागलेल्या स्पर्धेत सर्वाेच्च कामगिरी करणे हे वेगळेपण आहे. नीरज हे सैन्यात कार्यरत आहेत. सैन्याकडूनही त्याला खेळासाठी प्रोत्साहन देण्यात आले आहे. या वर्षीचे ‘ऑलिंपिक’ हे देशाला अधिक म्हणजे ७ पदके मिळवून देणारे ठरले आहे. १ सुवर्ण, २ रौप्य आणि ४ कास्य अशी पदके भारताला मिळाली आहेत.
नीरज यांनी रात्री झोपतांना ‘उद्या स्पर्धेनंतर देशाचे राष्ट्रगीत मैदानावर व्हायलाच हवे’, अशी जिद्द बाळगली होती आणि दुसर्या दिवशी त्यांचे स्वप्न साकार झाले. त्यांनी हे पदक भारताचे दिवंगत धावपटू आणि ‘फ्लाईंग सिख’ म्हणून ओळखले जाणारे मिल्खा सिंह यांना समर्पित केले आहे. मिल्खा सिंह आणि धावपटू पी.टी. उषा यांना ऑलिंपिकच्या पदकाने हुलकावणी दिली होती. त्यामुळे मिल्खा सिंह यांचे स्वप्न अपूर्ण राहिले होते, ‘सुवर्णपदक जिंकून भारताचा तिरंगा ऑलिंपिकच्या मैदानात फडकावण्याची माझी इच्छा कुणीतरी पूर्ण करावी’ असे त्यांनी जाहीरपणे बोलून दाखवले होते. नीरज या यशाविषयी म्हणाले, ‘‘ते साध्य करणे पुष्कळ कठीण असते. मी अनेक मास घरी गेलेलो नाही. पुष्कळ कष्ट करावे लागतातच.’’
भारताची माजी ॲथलेटपटू अंजू जॉर्ज यांनी आताच्या खेळाडूंच्या कामगिरीविषयी सांगितले की, ‘खेळाडूंप्रती आतापर्यंतच्या आणि आताच्या सरकारच्या प्रतिसादात भेद त्यांना ठळकपणे जाणवतो आहे, काहीतरी वेगळे घडत आहे. स्पर्धेला जाण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खेळाडू आणि त्यांचे कुटुंबीय यांच्याशी संवाद साधला, तेव्हा त्यांनी खेळाडूंना प्रोत्साहन दिले. खेळाडूने पदक जिंकल्यानंतर स्वत: पंतप्रधान मोदी खेळाडूला संपर्क करून अभिनंदन करून प्रोत्साहन देतात. हे सर्व वेगळेच घडत आहे. आधीच्या सरकारच्या काळात कौतुक व्हायचे; मात्र एवढ्या प्रमाणात पाठिंबा मिळाला नाही.’ अंजू जॉर्ज यांचे हे म्हणणे बरेच काही सांगून जाते.
मोदी सरकारने आणखी एक महत्त्वाची गोष्ट केली ती म्हणजे खेळाडूंना विदेशी प्रशिक्षकांचे उपलब्ध करून दिलेले साहाय्य. या विदेशी प्रशिक्षकांनी त्यांचे तंत्र, कौशल्य वापरले आणि खेळाडूंनी कष्ट केले, त्याचे चीज झाले. भारतीय प्रशिक्षकांनीही हे तंत्र त्यांच्याकडून शिकून खेळाडूंना घडवण्यासाठी सिद्ध झाले पाहिजे. यातून सरकारची भूमिका, त्यांचे पाठबळ मिळणे किती आवश्यक आहे, हेसुद्धा लक्षात येते.
आर्थिकदृष्ट्या कमकुवत खेळाडू !
वजन उचलण्यामध्ये (वेटलिफ्टिंग) रौप्य पदक मिळवणार्या मीराबाई चानू, ‘बॉक्सिंग’मध्ये कास्य पदक मिळवणार्या लवलिना बोर्गाेहाइन, महाराष्ट्रातून तिरंदाजीमध्ये चांगली कामगिरी करणारे प्रवीण जाधव हे अत्यंत गरीब कुटुंबातून आलेले आहेत. महिलांच्या हॉकीमध्ये चांगली कामगिरी केलेल्या भारताच्या महिला संघामधील सलिमा तेते यांचे घर तर अत्यंत विदीर्ण स्थितीत आहे. त्यांच्या कुटुंबियांना सलिमा यांचा सामना पहाता यावा म्हणून जिल्हाधिकार्यांनी त्यांच्या घरी टी.व्ही.ची तात्पुरती व्यवस्था केली. मीराबाई या त्यांच्या गावातून २५ कि.मी. अंतरावरील इंफाळ येथील प्रशिक्षणाच्या ठिकाणी जाण्यासाठी ट्रकचालकांकडे ‘लिफ्ट’ मागून जायच्या. ट्रकचालकांनी त्यांना साहाय्य केल्यामुळे त्यांना प्रशिक्षण घेता आले म्हणून पदक जिंकल्यानंतर मीराबाई यांनी त्यांना साहाय्य करणार्या सर्व ट्रकचालकांचा कृतज्ञता म्हणून सत्कार केला. ऑलिंपिकसारख्या आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करणार्या काही खेळाडूंचा अपवाद वगळल्यास अन्य सर्व खेळाडू गरीब कुटुंबातीलच आहेत. त्यांनी स्वबळावर आणि कष्ट अन् कौशल्य यांच्या जोरावरच स्पर्धेत चुणूक दाखवली आहे. भारतात क्रिकेटचे ‘फॅड’ अधिक आहे. क्रिकेटच्या खेळाडूंवर भरमसाठ पैसा व्यय केला जातो, खेळाडूंना कोट्यवधींचे मानधन मिळते. हे खेळाडू जाहिराती, आय.पी.एल्.चे सामने या माध्यमांतून बक्कळ पैसा कमावतात. काही सामने जिंकल्यानंतर त्यांच्यावर चारचाकी, रोख रक्कम यांच्या माध्यमांतून होणारी बक्षिसांची उधळण यांमुळे तरुणांना ‘याच खेळात भविष्य घडवूया’ असे वाटते. आतातर क्रिकेट झटपट पैसा आणि प्रसिद्धी मिळवून देणारा खेळ बनला आहे. त्या तुलनेत अन्य खेळाडूंना तेवढे काही मिळत नाही. साहजिकच त्यांच्या मनोधैर्यावर परिणाम होतो.
या स्पर्धेतील नीरज यांचा विजय हा देशाचा असला, तरी बहुविध संस्कृती, कला असलेल्या भारतात काही राज्यांचा विचार केला पाहिजे. हरयाणा, पंजाब आणि ईशान्येकडील राज्ये येथील खेळाडूंनी पदकांची कमाई केली. त्या तुलनेत महाराष्ट्रासह दक्षिणेतील राज्ये येथे लोकसंख्या अधिक असूनही ते स्पर्धेत का छाप पाडू शकले नाहीत ?, ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. अन्य राज्यांमध्ये क्रीडा प्रशिक्षण तेवढे दर्जेदार मिळत नाहीत कि त्या योग्यतेचे खेळाडू नाहीत ? महाराष्ट्रातील काही मान्यवरांनी ‘महाराष्ट्रातील शाळांमध्ये खेळांचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण दिले गेले पाहिजे’, अशी मागणी केली आहे. मोदी सरकारने ऑलिंपिक सामन्यांच्या दृष्टीने खेळाडूंना चांगले प्रशिक्षण मिळावे, यासाठी यंत्रणा उभारण्याच्या दृष्टीने काम चालू केले आहे. ‘आधीच्या अनेक सरकारांना खेळांमध्ये देशाला पुढे नेण्याची ही दृष्टीच नव्हती’, असेच म्हणावे लागेल. काँग्रेस सरकारच्या काळात तर देशातील व्यवस्थेचाच ‘खेळ’ झाला होता, ती त्रुटी मोदी सुधारत आहेत आणि खर्याखुर्या खेळांना न्याय मिळवून देत आहेत. नीरज यांनी ‘खेळांच्या दृष्टीने हे पालट चांगले आहेत’, हे कृतीतून दाखवून दिले आहे. अधिकाधिक भारतीय खेळांमध्ये तरुणांनी कौशल्य मिळवून आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये देशाचे नाव उज्ज्वल करावे, ही या निमित्ताने अपेक्षा !