चीन आणि ‘साम्य’वादी !

चीनच्या साम्यवादी पक्षाला (‘कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना’ला) यंदा १०० वर्षे पूर्ण झाली. त्या प्रीत्यर्थ भारतातील चीनच्या दुतावासाने एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ‘ऑनलाईन’ झालेल्या या कार्यक्रमामध्ये भारतातील साम्यवादी नेते सीताराम येच्युरी, डी. राजा आणि अन्य, तसेच तमिळनाडूतील द्रविड मुन्नेत्र कळघम (डी.एम्.के.) या पक्षाचे नेते सहभागी झाले होते. या वेळी या नेत्यांनी चीनला शुभेच्छा दिल्या. चीनने याविषयी अधिकृत बातमी प्रसिद्ध केली आहे. कार्यक्रमातील सहभागाविषयी नेत्यांना विचारणा केली असता, त्यांनी ‘आम्ही सहभागी झालो होतो’, असे निर्लज्जपणे सांगितले आणि वर ‘आम्हाला कुणी देशभक्ती शिकवू नये’, असेही सांगितले. भारतातील साम्यवाद्यांच्या या कृतीतून ‘चोर तो चोर वर शिरजोर’ या म्हणीचा प्रत्यय येतो.

कार्यक्रमामध्ये उपस्थित भारतातील साम्यवादी नेते

भारतद्वेष आणि चीनवर निष्ठा !

भारतातील साम्यवादी पक्षांची राष्ट्रनिष्ठा ही नेहमीच वादाचा विषय राहिली आहे. साम्यवाद्यांचा ‘भारताविषयीचा नेमका चांगला दृष्टीकोन काय ?’, हेच मुळात सर्वसामान्यांना समजत नाही. ‘सर्व समान हवे’, या तत्त्वापोटी सर्वच गोष्टींत असमानता बाळगणारे साम्यवादी वैचारिक गोंधळात पुरते अडकून गेले आहेत, असे म्हणावे लागेल. वर्ष १९६२ च्या भारत-चीन युद्धामध्ये भारतातील साम्यवाद्यांनी देशविरोधी भूमिका घेतली होती. म्हणजे एकीकडे भारतीय सैन्य कपटी चीनशी लढत होते, तर दुसरीकडे भारतातील साम्यवादी चीनच्या समर्थनार्थ वक्तव्ये करत होते. चीनने कपटाने भारतावर आक्रमण केल्यावर येथील साम्यवादी ‘भारतानेच चीनवर आक्रमण केले’, अशी चीनच्या राष्ट्रप्रमुखाच्या तोंडी शोभेल अशी भाषा बोलत होते. साम्यवादी हे आतापर्यंत ‘कपटी आणि क्रूर स्वभावाचे, माणुसकी न मानणारे’, असेच चित्र आहे. हे सर्व दुर्गुण भारतातील साम्यवाद्यांमध्ये ठासून भरले आहेतच. केरळ येथे त्याचा प्रत्यय प्रत्येक दिवसाआड होणार्‍या हिंदुत्वनिष्ठांच्या हत्यांमधून येतो. याआधी तो बंगालमध्ये यायचा ! ‘ओणम्’ या केरळातील सणाच्या वेळी सरकारने लोकांना ‘गर्दी जमवून कोरोना वाढवू नका’, असे सांगितले आणि लोकांना म्हणजेच हिंदूंना एकत्र येण्यास मज्जाव केला, तर बकरी ईदला मात्र धर्मांधांना मोकळीक आणि सवलत दिली. त्यामुळे एकाच दिवसात २० सहस्रांहून अधिक लोक कोरोनाच्या संसर्गाने बाधित झाले. हिंदूंना संपवण्यासाठी अशी असते साम्यवाद्यांची कपटनीती ! अय्यप्पा देवस्थानाच्या मार्गात कोरोना चाचणी करण्यासाठी भाविकांकडून २ सहस्र रुपयांपर्यंत रक्कम घेतली जाते, तर दुसरीकडे मौलवींचे वेतन मात्र सरकारी खजिन्यातून ! अय्यप्पा आणि अन्य देवस्थानांमध्ये जाण्यास कोणतीही सरकारी सवलत नाही, हजला मात्र जनतेच्या पैशांतून सोडले जाते. ‘लव्ह जिहाद’च्या माध्यमातून तेथील धर्मांध शेकडो हिंदु मुलींना बाटवून त्यांचे धर्मांतर करत आहेत. अशा घटना घडल्या, तरी ‘लव्ह जिहाद अस्तित्वातच नाही’, असे खोटे सांगून दुर्लक्ष करायचे. शेवटी साम्यवादी पक्षाच्या कार्यकर्त्याच्याच मुलीला धर्मांधांनी पळवल्यावर आणि काही ख्रिस्ती मुलींचे धर्मांतर झाल्यावर याविषयी ‘जाग आल्याचे’ सरकारने नाटक केले. असे आहेत साम्यवादी !

अनैसर्गिक साम्यवादी !

भारताची संस्कृती, सभ्यता, परंपरा यांच्याशी साम्यवाद्यांची नाळ कधी जोडली गेलेलीच नाही; कारण त्यांचे सर्वच म्हणजे अगदी साम्यवादाचे तत्त्वज्ञानही अनैसर्गिक आहे. असे अनैसर्गिक तत्त्वज्ञान, नियम भारतासारख्या देवभूमीत, ऋषिभूमीत कधी रूजूच शकत नाही. त्यामुळे साम्यवाद्यांना हळूहळू माघार घ्यावी लागत आहे. बंगालमध्ये अनेक दशके असलेला त्यांचा गड पुरता मोडून पडला आहे, तर भारताच्या अनेक राज्यांमध्ये साम्यवादी विचारसरणी जोपासणार्‍या पक्षांना निवडणुकीत भोपळाही फोडता आलेला नाही. केरळ येथे केवळ धर्मांधांना गोंजारल्यामुळे त्यांचे अस्तित्व टिकून आहे. म्हणजे येथे समानतेचे तत्त्व गुंडाळून ठेवून, दुसर्‍या शब्दांमध्ये स्वत:च्या तत्त्वज्ञानाची हत्या करूनच साम्यवाद्यांना सत्ता टिकवून ठेवता येत आहे. नाहीतर त्यांचे कर्तृत्व ते काय ? चीन गलवान खोर्‍यात आणि भारताशी असलेल्या सीमेमध्ये सातत्याने आगळीक करत आहे. कोरोनाचा ‘पिता’ चीनच आहे’, हे जग ओरडून सांगत आहे. त्याने अनेक देशांना देशोधडीला लावले आहे. अनेकांचे संसार उद्ध्वस्त केले आहेत. चीनमध्ये त्या तुलनेत काहीच हानी झाली नाही. वुहान आणि शांघाय येथे काही सहस्र व्यक्तींचे प्राण गेले, त्यानंतर पुढे काहीच माहिती बाहेर आलेली नाही. जागतिक आरोग्य परिषदेचे पथक कोरोनाचे उगमस्थान शोधण्यास चीनमध्ये गेल्यावर हात हलवत परत आले. त्यामुळे चीनला ‘आपण काहीही करू शकतो’, असे बहुधा वाटत असावे. परिणामी तालिबान या अत्यंत क्रूर आणि घातक आतंकवादी संघटनेशी युती करतांना चीन दिसतो. तालिबानच्या प्रमुखांनी चीनमध्ये जाऊन चिनी मंत्र्यांच्या भेटीगाठी घेतल्या. त्यांचे एकत्रित रूबाबात छायाचित्र काय प्रसिद्ध होते आणि ‘चिनी नागरिकांना काही करणार नाही’, असे निवेदन काय तालिबानकडून दिले जाते. सर्वच अघटित आहे !

आता निसर्गानेच चीनला तो जोपासत असलेल्या असमानतेविषयी शिक्षा द्यायचे ठरवलेले दिसते. चीनमध्ये झालेल्या अतीवृष्टीमुळे अनेक ठिकाणी महापूर आला असून मानवी वस्त्यांमध्ये पाणी शिरून पुष्कळ हानी झाली आहे. लाखो लोकांना विस्थापित करावे लागले आहे. चीनमधील अनेक धरणे भरून वाहू लागल्याने हाहा:कार उडाला आहे. आकाशात कृत्रिम चंद्र आणि सूर्य बसवणारा चीन आता या महापुराचे पाणी गडप करू शकण्याचा चमत्कार करू शकणार आहे का ? आता महापूरच चीनचे काय करायचे ते ठरवेल, अशी परिस्थिती आहे; मात्र हे मान्य करेल तो चीन कुठला ! असो. या गोष्टी भारतातील साम्यवादी म्हणजे चिनीप्रेमींसाठी अंजन आहेत. भारतातील साम्यवादी स्वत: सुधारतील याची शक्यता नाही. त्यामुळे भारत सरकारने या भारतद्वेषींवर कठोर कारवाई करून राष्ट्रद्वेषींची जागा भारतात केवळ कारागृहात आहे, हे कृतीतून दाखवून द्यावे आणि भारतियांचा सन्मान वाढवावा, ही अपेक्षा !