पणजी, ३० जुलै (वार्ता.) – राज्यात नुकत्याच आलेल्या पुरामध्ये ज्या कुटुंबियांचे घर पूर्णपणे मोडलेले आहे, त्यांना दीड ते २ लक्ष रुपयांपर्यंतची हानीभरपाई १५ ऑगस्टपर्यंत दिली जाणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोवा विधानसभेत केली. विधानसभेत उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत उत्तर देत होते.
ते पुढे म्हणाले, ‘‘पुरामध्ये ज्या घरांची मोठ्या प्रमाणात हानी झालेली आहे, त्यांना हानीभरपाई म्हणून १ लक्ष रुपये, तर ज्या घरांची लहान स्वरूपात हानी झालेली आहे त्यांना २५ ते ५० सहस्र रुपयांपर्यंत हानीभरपाई दिली जाणार आहे. चालू वर्षी सप्टेंबर ते ऑक्टोबरपर्यंत ही हानीभरपाई दिली जाणार आहे. ‘राष्ट्रीय आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरणा’ने शिफारस केलेल्या रकमेत गोवा शासनाची अतिरिक्त रक्कम समाविष्ट करून पूरग्रस्तांना अधिकाधिक हानीभरपाई देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.’’ तिलारी आणि म्हादई या नद्यांच्या परिसरात ३ दिवसांच्या कालावधीत सुमारे १५ ते २५ सेंटीमीटर पाऊस पडल्याने या परिसरात पूर आला होता.