नियम पाळा अन्यथा जिल्ह्यात पुन्हा कडक निर्बंध लादण्यात येतील ! – राधाकृष्ण गमे, नाशिक विभागीय आयुक्त

राधाकृष्ण गमे

नगर, ३० जुलै – जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत आहे. या रुग्णवाढीची कारणे शोधून तात्काळ प्रतिबंधात्मक उपाययोजना करा, चाचण्यांची संख्या वाढवा, प्रतिबंधात्मक क्षेत्र घोषित करा, प्रतिबंधात्मक नियमांचे पालन न करणारी आस्थापने बंद करा आणि एवढे करूनही कोरोना रुग्णसंख्या वाढतच राहिली, तर पुन्हा कडक निर्बंध लागू करावे लागतील, अशी चेतावणी नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिली. ते जिल्हा आढावा बैठकीत बोलत होते. या वेळी प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

गमे पुढे म्हणाले की, बरे होणार्‍या रुग्णांच्या तुलनेत नव्याने आढळणार्‍या रुग्णांची संख्या अधिक असल्याने रुग्णालयातील खाटा पुन्हा भरू लागल्या आहेत. रुग्णसंख्या वाढत राहिली तर त्याचा ताण आरोग्ययंत्रणेवर येणार आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारे कोरोना संसर्ग पसरण्यास कारणीभूत ठरणार्‍या घटकांना सवलत देऊ नका.