सांगली, २९ जुलै – हवामान खात्याने या आठवड्यात कोयना धरण क्षेत्र आणि परिसर येथे अतीवृष्टीचा अंदाज वर्तवल्याने कृष्णा नदीची पाणी पातळी पुन्हा ४० ते ४२ फुटांपर्यंत पोचण्यात शक्यता आहे. त्यामुळे या भागातून स्थलांतरित झालेल्या नागरिकांनी प्रशासनाच्या वतीने सूचना दिल्याविना पुन्हा घरी परतू नये, तसेच व्यापार्यांनीही दुकानातील मौल्यवान वस्तू, अत्यावश्यक वस्तू पुन्हा दुकानात आणण्याची घाई करू नये, असे आवाहन सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी केले आहे.
हवामान विभागाने कोयना धरण क्षेत्रात अतीवृष्टीची चेतावणी दिल्याने कोयना धरणातून होणारा विसर्ग ३३ सहस्र क्युसेक्स वरून ४९ सहस्र करण्यात आला आहे, तर वारणा धरणाचा विसर्ग ९ सहस्र ७०० वरून १४ सहस्र ९८० क्युसेक्स करण्यात आला आहे.