पूरस्थितीनंतर ३२ मार्गांवर वाहतूक चालू !

प्रतिकात्मक छायाचित्र

कोल्हापूर – मुसळधार पावसामुळे राज्य मार्ग, जिल्हा मार्ग आणि महामार्ग येथे पुराचे पाणी असल्याने मागील ८ दिवस एस्.टी. बसची सेवा बंद होती. आता ४ मार्ग वगळता जिल्ह्यातील ३२ मार्गांवर एस्.टी. बससेवा चालू झाली आहे. यामध्ये कोल्हापूर-पुणे मार्गावर सर्वाधिक प्रवाशांनी प्रवास केला आहे, तर ४ दिवसांपासून अडकून पडलेल्या प्रवाशांनाही स्वत:च्या गावी सुखरूप पोचता आले आहे, अशी माहिती एस्.टी.च्या वाहतूक विभागाने दिली.

तालुका मार्गांवरील विविध गावांजवळ पुराचे पाणी आले. त्यामुळे जिल्ह्यात ४० मार्गांवरील एस्.टी. बसच्या फेर्‍या रहित कराव्या लागल्या. यामध्ये २२ आणि २३ जुलै या दिवशी झालेल्या मुसळधार पावसामुळे महामार्गही बंद झाला होता. त्यामुळे मुंबई, पुणे, सोलापूर आणि सांगली येथे निघालेले अनेक प्रवासी येथे अडकले होते.