‘सनातनचे संत पू. शिवाजी वटकर यांनी प्राथमिक संकलन शिकण्यास प्रारंभ केला. १६.११.२०२० या दिवशीपासून मी त्यांना संकलनासाठी साहाय्य करू लागले. पू. काकांचे वय ७४ वर्षे असूनही त्यांची सेवा परिपूर्ण करण्याची तळमळ, परात्पर गुरुदेवांप्रती भाव, चिकाटी, प्रेमभाव, सतत विचारण्याची आणि शिकण्याची वृत्ती, असे अनेक दैवी गुण मला शिकायला मिळाले. त्यांच्या संत सहवासामुळे मला झालेला लाभ येथे दिला आहे.
१. इतरांचा विचार करणे
पू. काका सकाळीच मला भ्रमणभाष करून विचारायचे, ‘‘तुम्हाला आज वेळ कधी आहे ? काही तातडीची सेवा नाही ना ?’’ मी त्यांना म्हणायचे, ‘‘पू. काका, तुमची वेळ सांगा. त्या वेळेत आपण सेवेला बसू शकतो.’’ तरी पुन्हा ते माझी वेळ विचारूनच येत असत. सेवा संपल्यावरही ते मला नेहमी म्हणत, ‘‘मी तुमचा पुष्कळ वेळ घेतो.’’ प्रत्यक्षात त्यांच्यासमवेत सेवा केल्यामुळे मलाच त्यांच्या चैतन्याचा लाभ होत असे.
२. शिकण्याची वृत्ती असल्याने नवीन सूत्रे वहीत लिहून घेणारे पू. वटकरकाका !
प्रारंभी पू. वटकरकाकांना संकलनासाठी लहान लहान धारिका दिल्या होत्या. प्रथम त्यांना व्याकरणाचे नियम सांगितल्यावर ते म्हणायचे, ‘‘गुरुदेवांच्या कृपेने ही सेवा मिळाली आहे, तर आता तेच करून घेतील. आता माझ्या विशेष लक्षात रहात नाही.’’ प्रत्येक वेळी त्यांना कोणताही शब्द किंवा र्हस्व, दीर्घ असे काही लक्षात आल्यास ते वहीत लिहून घ्यायचे. इतर वेळी सेवा करतांना त्यांना एखादा शब्द अडल्यास ते लगेच मला भ्रमणभाष करून विचारतात किंवा काही वेळेला आश्रमातील साधकांनाही विचारतात.
३. चुकांविषयी संवेदनशीलता
काही शब्द चुकल्यावर ‘मी किती चुका करतो’, असे ते म्हणतात. दुसर्या दिवशी एखादा सांगितलेला शब्द पुन्हा चुकला, तर ते म्हणतात, ‘‘मी अनुत्तीर्ण झालो. मी कसा अभ्यास करू ?’’ ते मला नेहमी असे नम्रपणे विचारतात. काही वेळेला वयोमानामुळेही त्यांना एखादा शब्द लक्षात राहिला नाही, तर त्यांना चुकीची खंत वाटते.
४. इतरांच्या लिखाणात झालेल्या चुका अभ्यासून ‘त्या होऊ नयेत’, यासाठी प्रयत्न करणे
आता पू. काकांना संकलन येत असल्याने दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये छापून आलेल्या साधकांच्या अनुभूती, लेख वाचून ते सतत अभ्यास करण्याचा प्रयत्न करतात. ‘लिखाणात त्यांना काही चूक लक्षात आल्यास ‘ती कोणत्या स्तरावर झाली आहे’, हे ते प्रथम विचारून घेतात. त्यानंतर ‘उत्तरदायी साधकाला सांगून त्या चुकीविषयी पाठपुरावा घेतात आणि ‘पुन्हा अशी चूक होऊ नये’, याची काळजी घेण्यास प्रेमाने सांगतात.
५. सेवेची तळमळ
पू. काका पहाटे लवकर उठून सेवेला आरंभ करतात. काही शब्द विचारायचे असल्यास त्या वेळी ते लिहून ठेवतात आणि नंतर मला विचारतात. संकलन सेवेसाठी आलेल्या धारिकांतूनही ते सतत शिकत असतात. ते मला नेहमी सांगतात, ‘‘साधकांचा भाव आणि परात्पर गुरु डॉक्टरांवर असलेली त्यांची श्रद्धा यांतून मलाच शिकायला मिळत आहे. वयाच्या ७४ व्या वर्षीही त्यांची संकलन शिकण्याची तळमळ तरुणांना लाजवणारी आहे. त्यांच्या या तळमळीमुळे ते केवळ ३ मासांतच प्राथमिक संकलन करण्यास शिकले.
६. अनुभूती
पू. काकांच्या चैतन्यामुळे धारिकेतील वाक्यरचना आणि मथळे लवकर सुचल्याने धारिका २ घंट्यांऐवजी १.३० घंट्यातच पूर्ण होणे : एकदा मी एका मोठ्या (साधारण ६० केबीच्या) धारिकेचे संकलन करत होते. ‘रात्रीपर्यंत ही धारिका पूर्ण करूया’, असे मी ठरवले होते. संध्याकाळी ६ नंतर पू. काकांनी मला विचारले, ‘‘आपण महाप्रसादानंतर सेवेसाठी थोडा वेळ बसूया का ? मला काही शंका विचारायच्या आहेत.’’ त्या क्षणी माझ्या मनात विचार आला, ‘आज आपल्याला एका मोठ्या धारिकेचे संकलनही करायचे आहे. ती धारिका थोडी उशिरा करूया आणि आता संतांच्या चैतन्याचा लाभ घेऊया’, असा विचार करून मी त्यांना सांगितले, ‘‘हो. महाप्रसाद झाल्यावर आपण बसूया.’’ त्याप्रमाणे आम्ही १ घंटा सेवेसाठी बसलो. तोपर्यंत साडेआठ वाजले आणि त्यानंतर लगेचच मी माझ्याकडील धारिकेचे संकलन करू लागले. पू. काकांच्या चैतन्यामुळे त्या धारिकेतील वाक्यरचना आणि मथळे मला लवकर सुचल्याने ती धारिका २ घंट्यांऐवजी १.३० घंट्यातच पूर्ण झाल्याची मला अनुभूती आली. त्यानंतर असे २ – ३ वेळेला घडले. परात्पर गुरु डॉक्टर नेहमी सांगतात, ‘‘संत हे ईश्वराचे सगुण रूप आहेत.’’ या वाक्याची मला प्रचीती झाली.
परात्पर गुरु डॉक्टर, आपल्याच कृपेमुळे मला संतांसमवेत सेवा करण्याची पुष्कळ मोठी संधी मिळाली आहे. ‘पू. काकांसारखे गुण माझ्यात येण्यासाठी आपणच माझ्याकडून प्रयत्न करवून घ्या’, अशी आपल्या चरणी शरणागतभावाने प्रार्थना करते.’
– श्रीमती मनीषा गाडगीळ (६५ टक्के आध्यात्मिक पातळी), सनातन संकुल, देवद, पनवेल. (३०.३.२०२१)
देवाकडून ‘वन मॅन आर्मी’ आणि ‘आदर्श धर्मरक्षक’ ही पदवी प्राप्त करणारे पू. शिवाजी वटकरकाका ।
देवावरील श्रद्धेपोटी देवतांचे विडंबन एकहाती रोखले ज्यांनी ।
‘वन मॅन आर्मी’ आणि ‘आदर्श धर्मरक्षक’ ही पदवी त्यासाठी दिली देवांनी ।। १ ।।
कठोर व्यष्टी साधना करूनी संतपद गाठले ज्यांनी ।
भगवंताची स्तुती करीती ते अनेक काव्यांतूनी ।। २ ।।
भगवंताचा (टीप १) सगुणातून सहवास ज्यांना लाभला बहुत ।
भगवंताची गुणवैशिष्ट्ये लिहूनी साधकांना केले उपकृत ।। ३ ।।
प्रसंग असो वा बातमी किंवा एखादी अनुभूती ।
समष्टी भावापोटी ती लिहूनी तात्काळ सर्वांपर्यंत पोचवती ।। ४ ।।
मूर्ती लहान; पण कीर्ती महान, ही उक्ती सार्थ केली ज्यांनी ।
नमितो आम्ही सर्व साधकजन पूज्य वटकरकाकांच्या चरणी ।। ५ ।।
टीप १ : परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले
– श्री. शशांक जोशी, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (९.१.२०२१)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |