प.पू. देवबाबा यांचा गुरुपौर्णिमेनिमित्त साधकांना संदेश
‘सनातन धर्मात गुरूंनी दाखवलेल्या मार्गावर वाटचाल करणारे शिष्य पुढे अत्यंत ज्ञानी होऊन गगनभरारी घेतात. गुरु जीवित असतांना शिष्याची प्रगती होतच असते; परंतु गुरूंच्या निर्वाणानंतरही शिष्याची प्रचंड प्रगती होऊन तो श्रेष्ठ शिष्य म्हणून प्रसिद्ध होतो. प.पू. डॉ. आठवले यांचे गुरु प.पू. भक्तराज महाराज हे श्रद्धास्थान असलेली सनातन संस्था मोठी भरारी घेईल. नामजपातून शक्तीची निर्मिती, विविध व्याधींचे निवारण होण्यासाठी वेगवेगळे नामजप करणे आदी संशोधन कार्य प.पू. डॉ. आठवले यांनी प्रारंभ केले आहे. ‘संगीत, नृत्य, गायन, चित्रकला आदींच्या माध्यमातून साधक संत होऊ शकतो, याचे संशोधन करून ते सिद्ध करणारे जगातील पहिले संत’, असे परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे वर्णन करता येईल. त्याच वेळी हिंदु धर्मपालक आणि आध्यात्मिक सैनिक म्हणून जगत असलेले या शतकातील अत्यंत श्रेष्ठ संतही तेच आहेत, असे सांगतांना हृदय भरून येते. सत्याच्या लढ्यात अग्रेसर असणारे प.पू. डॉ. आठवले यांनी सोसलेले घाव १-२ नाहीत, तर सहस्रो आहेत. त्यांनी ‘माझे काहीच नाही’, असे सांगून सर्वकाही श्रीकृष्णाच्या चरणी अर्पण केले आहे. आपल्यावरील संकटे हसत हसत झेलणार्या या महान संतांना सदैव विजय प्राप्त होऊ दे, हेच मागणे आहे.
‘सर्व सनातन धर्मीय, तसेच या भूमीवर निवास करणारे सर्व संत आणि साधक यांचे शुभ होवो’, हीच परमेश्वराच्या चरणी या गुरुपौर्णिमेच्या शुभदिनी आपण सर्वांनी संघटित होऊन आणि शरण जाऊन प्रार्थना करूया.’
– प.पू. देवबाबा, श्री शक्तीदर्शन योगाश्रम, किन्निगोळी, कर्नाटक. (एप्रिल २०२१)