राष्ट्रीय वारकरी परिषदेचे ह.भ.प. बापू महाराज रावकर यांचे आवाहन
पंढरपूर (जिल्हा सोलापूर), १८ जुलै (वार्ता.) – कीर्तनकारांनी भावनेच्या भरात सर्वधर्मसमभाव शिकवण्याच्या नावाखाली हिंदु धर्म, देवता आणि संत यांच्याविषयी टीका करू नये, असे आवाहन राष्ट्रीय वारकरी परिषदेचे कार्याध्यक्ष ह.भ.प. बापू महाराज रावकर यांनी प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून केले आहे.
प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की,
१. राजकीय मंडळी मतांसाठी सप्ताह, कथा, कीर्तन असे कार्यक्रम आयोजित करून त्यामध्ये जे कीर्तनकार देवता, हिंदु धर्म आणि संत यांच्यावर टीका करतील, तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याला विरोध करतील, अशा कीर्तनकारांना जाणीवपूर्वक बोलवतात. भावनेच्या भरात सर्वधर्मसमभाव शिकवण्याच्या नादात ते कीर्तनकार हिंदु धर्मावर टीका करतात. अन्य धर्मीय, तसेच सत्ता अन् स्वार्थ यांसाठी हिंदु धर्मद्वेषी लोक कीर्तनाच्या नावाखाली त्याचा ‘व्हिडिओ’ सिद्ध करून प्रसारित करतात.
२. नुकताच एक प्रकार कीर्तनकार ज्ञानेश्वर महाराज वाबळे यांच्याविषयी घडला असून त्यांचे ‘व्हिडिओ’ही प्रसारित झाले आहेत. यामध्ये वाबळे यांनी वारकरी संप्रदायाच्या व्यासपिठावरून वारकरी संप्रदायाच्या विरोधात भूमिका मांडली आणि वारकर्यांच्या मनात असंतोष निर्माण केला. याविषयी राष्ट्रीय वारकरी परिषदेने त्यांना खडसावल्यावर क्षमायाचना करतांनाचा ‘व्हिडिओ’ वाबळे यांनी प्रसारित केला आहे.
३. राष्ट्रीय वारकरी परिषदेच्या वतीने विनंती करण्यात येते की, आपल्या परिसरामध्ये असे कार्यक्रम कुणी आयोजित करून धर्मविरोधी वक्तव्य केल्यास धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट करा.