अशी मागणी का करावी लागते ? प्रशासनाला ते लक्षात येत नाही का ?
सातारा, १६ जुलै (वार्ता.) – सातारा जिल्हा आरोग्य अधिकारी आधुनिक वैद्य अनिरुद्ध आठल्ये हे रत्नागिरी येथे प्रतिनियुक्तीवर गेले आहे. गत २ आठवड्यांपासून आधुनिक वैद्य सचिन पाटील हे प्रभारी म्हणून कार्यभार पहात आहेत; परंतु कोरोना काळात जिल्ह्यासाठी पूर्णवेळ आरोग्य अधिकारी असणे आवश्यक आहे, अशी मागणी सूज्ञ नागरिक करत आहेत.
गत २ वर्षांहून अधिक काळ सातारा जिल्हा आरोग्य अधिकारीपदी आधुनिक वैद्य अनिरुद्ध आठल्ये कार्यरत होते. या काळात त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली; मात्र अचानक त्यांची रत्नागिरी येथे बदली करण्यात आली. त्यामुळे कोरोनाविषयी धोरणे ठरवतांना आरोग्य विभागाला काही बंधने येत आहेत. त्यामुळे तातडीने जिल्ह्यासाठी आरोग्य अधिकारी नियुक्त करण्यात यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.