कुंकळ्ळी येथील उठावाचा उचित मानसन्‍मान राखणे महत्त्वाचे ! – डॉ. संजय सावंत देसाई, प्राचार्य, कुंकळ्ळी महाविद्यालय

कुंकळ्ळी येथे पोर्तुगिजांच्‍या विरोधातील प्रथम उठावाच्‍या ४३८ व्‍या जयंतीच्‍या निमित्ताने कार्यक्रम

मडगाव, १५ जुलै (वार्ता.) – कुंकळ्ळी येथील शूरविरांनी ४३८ वर्षांपूर्वी अपुर्‍या साधनसुविधा, अपुरे शस्‍त्रबळ, अपुरे शिक्षण आणि अपुरी सिद्धता असतांनाही बलशाली आणि शस्‍त्रसंपन्‍न पोर्तुगीज सत्तेच्‍या विरोधात दिलेल्‍या लढ्याला अनन्‍यसाधारण महत्त्व आहे. कुंकळ्ळीवासियांनी दाखवलेल्‍या या शौर्याला तोड नाही. कुंकळ्ळी येथील उठावाचा उचित मानसन्‍मान राखणे महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन कुंकळ्ळी येथील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय सावंत देसाई यांनी केले. ‘कुंकळ्ळी महानायक ट्रस्‍ट’ आणि ‘कुंकळ्ळी उच्‍च माध्‍यमिक विद्यालय’ यांनी कुंकळ्ळी येथे पोर्तुगिजांच्‍या विरोधातील प्रथम उठावाच्‍या ४३८ व्‍या जयंतीच्‍या निमित्ताने आयोजित केलेल्‍या कार्यक्रमात प्रमुख वक्‍ते या नात्‍याने ते बोलत होते. या वेळी व्‍यासपिठावर कुंकळ्ळी पालिकेचे नगराध्‍यक्ष डॉ. लक्ष्मण नाईक, ‘कुंकळ्ळी महानायक ट्रस्‍ट’चे अध्‍यक्ष ऑक्‍सर मार्टिन्‍स, प्रा. सुभाष वेलिंगकर, अधिवक्‍ता एल्‍विस गोम्‍स आदींची उपस्‍थिती होती.

प्राचार्य डॉ. संजय सावंत देसाई पुढे म्‍हणाले, ‘‘कुंकळ्ळीचा उठाव हा एक दिवसाचा नसून हा संघर्षाचा लढा आहे. पोर्तुगीज गोव्‍यात आल्‍यावर ७३ वर्षांनी कुंकळ्ळी येथे प्रथमच त्‍यांच्‍या विरोधात लढा दिला गेला. पोर्तुगिजांकडून होणारा छळ, यातना, क्‍लेश आणि अपकीर्ती यांमुळे कुंकळ्ळीवासीय स्‍वाभिमानाने अन्‍यायाच्‍या विरोधात लढले आणि याची परिणती वर्ष १८५७ च्‍या लढ्यात आणि त्‍यानंतर असहकार आंदोलनात झाली.’’

कुंकळ्ळीचे नगराध्‍यक्ष डॉ. लक्ष्मण नाईक म्‍हणाले, ‘‘कुंकळ्ळीच्‍या लढ्याचा एक कुंकळ्ळीवासीय या नात्‍याने मला अभिमान आहे. येथे १६ महानायकांनी आहुती दिल्‍याने आपले अस्‍तित्‍व आज राहिले आहे. येथील ऐतिहासिक वारसा जपण्‍यासाठी प्रत्‍येकाच्‍या सहकार्याची आवश्‍यकता आहे.’’

कार्यक्रमाच्‍या प्रारंभी ‘कुंकळ्ळी महानायक ट्रस्‍ट’चे अध्‍यक्ष ऑक्‍सर मार्टिन्‍स यांनी कुंकळ्ळी येथील लढ्याचा इतिहासाचे कथन केले.

क्षणचित्र

कुंकळ्ळीवासियांच्‍या प्रथम उठावाच्‍या ४३८ व्‍या जयंतीच्‍या निमित्ताने कुंकळ्ळी उच्‍च माध्‍यमिक विद्यालयाच्‍या ‘निसर्ग क्‍लब’ आणि ‘एन्.एस्.एस्.’ विभाग यांनी १६ महानायकांच्‍या स्‍मारकाच्‍या आवाराची काळजी घेण्‍याचे ठरवले आहे. या निमित्ताने विद्यालयाचा ‘निसर्ग क्‍लब’ आणि ‘एन्.एस्.एस्.’ विभाग यांनी स्‍मारकाच्‍या आवारात प्रतिकात्‍मक १६ झाडे लावली. ही झाडे आणि स्‍मारक यांच्‍या देखभालीचे संपूर्ण दायित्‍व ‘एन्.एस्.एस्.’ विभागाने उचलले आहे. या आशयाचे पत्र महाविद्यालयाच्‍या वतीने ‘कुंकळ्ळी महानायक ट्रस्‍ट’ला देण्‍यात आले.

‘भारत माता की जय’ संघाच्‍या वतीने महानायक हुतात्‍मा स्‍मारकाला पुष्‍पहार अर्पण करून अभिवादन !

कुंकळ्ळी येथे पोर्तुगिजांच्‍या विरोधातील प्रथम उठावाच्‍या ४३८ व्‍या जयंतीच्‍या निमित्ताने ‘भारत माता की जय’ संघाचे राज्‍य संघचालक प्राचार्य सुभाष वेलिंगकर यांनी महानायक हुतात्‍मा स्‍मारकाला पुष्‍पहार अर्पण केला. याप्रसंगी प्रा. सुभाष वेलिंगकर ट्‍वीट करून म्‍हणाले, ‘‘गोवा मुक्‍तीच्‍या ६० व्‍या वर्षातला आजचा कुंकळ्ळी स्‍वातंत्र्यलढ्याचा ४३८ वा स्‍मृतीदिन आहे. हा इतिहास पाठ्यपुस्‍तकात समाविष्‍ट करण्‍याची वचने भाजपच्‍या ३ मुख्‍यमंत्र्यांनी दिली आहेत; मात्र या वचनांचे पालन कोण करणार ?’’