गुण वाढवून देतो असे सांगत विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी करणार्‍या पुणे येथील कर्मचार्‍याच्या तोंडाला काळे फासून धिंड काढली !

अशा वासनांधांना कठोर शिक्षा करायला हवी तरच ते असा गुन्हा करण्यास धजावणार नाहीत !

प्रतिकात्मक छायाचित्र

पुणे, १५ जुलै – कोरोना काळात बारावीच्या परीक्षा रहित झाल्यानंतर अंतर्गत मूल्यांकनाच्या आधारे विद्यार्थ्यांना उत्तीर्ण केले जाईल, असे सांगण्यात आले. याचाच अपलाभ घेत अभिजित पवार या पुण्यातील एका नामांकित शाळेच्या कर्मचार्‍याने बारावीच्या परीक्षेत गुण वाढवून देतो, असे सांगून बारावीच्या एका विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी केल्याचे समोर आले आहे. विद्यार्थिनीच्या पालकांना ही गोष्ट समजल्यानंतर त्यांनी १४ जुलै या दिवशी या विकृत कर्मचार्‍याच्या तोंडाला काळे फासून महाविद्यालय ते विश्रामबाग पोलीस ठाण्यापर्यंत धिंड काढली. विश्रामबाग पोलिसांनी संबंधित शिक्षकाच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा नोंद केला आहे. आरोपीने गुन्हा मान्य केल्याचे पोलिसांकडून समजते.

‘अभिजित हा त्या मुलीला बारावीच्या परीक्षेत गुण वाढवून देतो’, असे सांगत वारंवार तिच्याकडे शरीरसुखाची मागणी करत होता. तिच्या नकारानंतरही तो तिला भ्रमणभाष करत होता. या मागणीच्या त्रासाला कंटाळून तिने अभिजितने केलेला भ्रमणभाषवरील कॉल’ ध्वनीमुद्रीत करून स्वत:च्या पालकांना ऐकवला.