आषाढी यात्रेनिमित्त श्री विठ्ठलाचे ‘ऑनलाईन’ दर्शन २४ घंटे चालू रहाणार !

पंढरपूर (जिल्हा सोलापूर) – येथे १२ जुलै या दिवशी परंपरेनुसार देवाचा पलंग कढण्यात आला. कोरोना संसर्गामुळे मंदिर बंद असले तरी भाविकांसाठी श्री विठ्ठलाचे २४ घंटे ‘ऑनलाईन’ दर्शन चालू रहाणार आहे. आषाढी यात्रेच्या कालावधीत वारकरी आणि भाविक मोठ्या प्रमाणात पंढरपूर येथे येत असत. या काळात अधिकाधिक भाविकांना देवाचे दर्शन व्हावे यासाठी श्री विठ्ठल आणि रुक्मिणी २४ घंटे उभे राहून दर्शन देत असतात. या कालावधीत देव निद्रा घेत नाहीत, तसेच देवाची शेजआरतीही या काळात बंद असते. याला परंपरेनुसार ‘देवाचा पलंग काढला’, असे म्हटले जाते. वर्षानुवर्षे ही परंपरा चालू आहे.

आषाढ शुद्ध प्रतिपदा ते पौर्णिमा या काळात, म्हणजे आषाढी यात्रेच्या काळात श्री विठ्ठल निद्रा घेत नाही. १२ जुलै या दिवशी मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी श्री विठ्ठलाची पूजा करून देवाच्या पाठीला लोड लावला आणि नंतर ‘श्रीं’च्या शेजघरातील ‘श्रीं’चा पलंग काढण्यात आला. याच पद्धतीने रुक्मिणी मातेच्या शेजघरातील पलंगही काढण्यात आला.