पुणे येथील सनातनच्या ५८ व्या व्यष्टी संत पू. (श्रीमती) विजयालक्ष्मी काळेआजी (वय ८६ वर्षे) यांचा साधनाप्रवास !

२३ जुलै २०२१ या दिवशी आषाढ पौर्णिमा अर्थात् गुरुपौर्णिमा आहे. गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या या दिवशी गुरुतत्त्व सहस्र पटींनी कार्यरत असते. या गुरुपौर्णिमेचा साधकांना अधिकाधिक लाभ व्हावा, या दृष्टीने गुरुकृपायोगाच्या माध्यमातून जलद आध्यात्मिक उन्नती करून संतपद गाठलेल्या संतांविषयी लिखाण प्रकाशित करत आहोत. 

या लेखमालेत आज आपण पुणे येथील सनातनच्या ५८ व्या संत पू. (श्रीमती) विजयालक्ष्मी काळेआजी यांचा सनातन संस्थेशी संपर्क झाल्यानंतरचा पुढील साधनाप्रवास पहाणार आहोत.          

(भाग २)

या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/494357.html

आज आषाढ शुक्ल पक्ष चतुर्थी (१४ जुलै २०२१) या दिवशी पू. (श्रीमती) विजयालक्ष्मी काळेआजी यांचा वाढदिवस आहे.

पू. (श्रीमती) विजयालक्ष्मी काळेआजी यांच्या चरणी वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराचा कृतज्ञतापूर्वक नमस्कार !

पू. (श्रीमती) विजयालक्ष्मी काळेआजी यांचा परिचय

पूर्ण नाव : श्रीमती विजयालक्ष्मी विष्णु  काळे
वय : ८६ वर्षे
जन्मदिनांक : ५ जुलै १९३५
शिक्षण : एम्.ए.एम्.एड्. (संगीतात बी.ए., हिस्टरी सोशीओलॉजी एम्.ए.)
साधनेला आरंभ : वर्ष १९९७
संतपद कधी : १७.३.२०१६

पू. (श्रीमती) विजयालक्ष्मी काळेआजी यांनी ३३ वर्षे माध्यमिक शिक्षिका म्हणून कन्या शाळा कराड येथे नोकरी केली. इतिहास, भूगोल, इंग्रजी आणि गृहशास्त्र (होम सायन्स) हे विषय त्या शिकवत असत. वर्ष १९९३ मध्ये त्या निवृत्त झाल्या. वर्ष १९९७ पासून त्यांनी सनातन संस्थेच्या मार्गदर्शनाखाली साधनेला आरंभ केला. प्रसारात नामदिंड्या, नैतिकमूल्य प्रवचने, दैनिक वितरण, संकलन, सत्संग घेणे इत्यादी विविध सेवा करत त्यांनी वर्ष २०१० मध्ये ६१ टक्के आध्यात्मिक पातळी प्राप्त केली आणि वर्ष २०१६ मध्ये त्या संतपदी विराजमान झाल्या. सध्या त्या समष्टीसाठी नामजप करण्याची सेवा करतात.

१३ जुलै २०२१ या दिवशी आपण पू. (श्रीमती) विजयालक्ष्मी काळेआजी यांचा सनातन संस्थेशी संपर्क आणि त्यांच्या साधनेला झालेला प्रारंभ हा भाग पाहिला. आज १४ जुलै या दिवशी आपण पुढील साधनाप्रवास पहाणार आहोत.

३. सेवेला आरंभ

३ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कराड येथील सार्वजनिक सभेचा प्रचार करणे

८.२.१९९८ या दिवशी कराड येथे प.पू. गुरुदेवांच्या सार्वजनिक (जाहीर) सभेचे आयोजन करण्यात आले होते. आधुनिक वैद्य दुर्गेश सामंत आणि आधुनिक वैद्य भिकाजी भोसले यांच्या नियोजनानुसार सत्संग प्रमुखांसमवेत आम्ही दोघे मलकापूर, जाखीनवाडी इत्यादी ठिकाणी कोपरा सभा, चर्चा यांद्वारे सभेच्या प्रचाराच्या सेवेत सहभागी झालो. प.पू. गुरुदेवांचे शिवाजी हायस्कूलच्या पटांगणात सर्वांना अतिशय भारावून टाकणारे प्रवचन झाले. अपेक्षेपेक्षाही अधिक लोक सभेसाठी आले होते. त्यानंतर त्यापैकी अनेक जण पुढे साधक झाले.

३ आ. ग्रंथप्रदर्शनसेवा

आम्ही प्रत्येक आठवड्याला त्या त्या देवतेच्या वारानुसार आणि काही विशिष्ट उत्सवप्रसंगी देवळांमध्ये ग्रंथप्रदर्शने लावत होतो. त्या अंतर्गत भक्तांना चपला रांगेत ठेवण्यास सांगणे, दर्शनासाठी भक्तांना रांगेत उभे करणे, अशा सेवा चालू झाल्या. आधुनिक वैद्य भोसले यांच्या गाडीतून ठिकठिकाणी जाता येत असल्याने आम्हाला दूरवरच्या ठिकाणी प्रवचने, ग्रंथप्रदर्शने आणि सत्संग घेणेही सहज शक्य होत असे.

३ इ. ‘नैतिक मूल्यांचे संवर्धन’ या विषयावर प्रवचने करण्याची सेवा मिळणे

ज्येष्ठ साधकांच्या अभ्यासवर्गात आम्हाला ‘नैतिक मूल्यांचे संवर्धन’ हा भाग शिकायला मिळाला. त्यानुसार मला प्रथम कराडमधील माध्यमिक शाळांमधून ‘समाजसेवा’ या शाळेच्या तासिकेत ‘नैतिक मूल्यांचे संवर्धन आणि अध्यात्मशास्त्र’ हा भाग शिकवण्याची सेवा मिळाली. एकाच वेळी शाळेच्या सुमारे २० – २० जणांच्या तुकड्यांमधून ही प्रवचने होत असत. साहजिकच अधिक साधकांना ही सेवा मिळे. ही केवळ प.पू. गुरुदेवांची आमच्यावर झालेली कृपाच होती. नंतर ही सेवा तालुक्यातील ठिकठिकाणच्या शाळांमधून मिळू लागली. त्यामुळे साधकांमध्ये सभाधीटपणा, आत्मविश्वास आणि समाजात प्रवचने करण्याचा उत्साह वाढू लागला. त्यातून अनेक साधक घडले.

३ ई. गुरुमौर्णिमेला गुरुपूजनाच्या सेवेचे भाग्य लाभणे

आमची प्रचार सेवा चालूच होती. एकदा आधुनिक वैद्य दुर्गेश सामंत यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त असलेली गुरुपूजनाची छापील प्रत मला वाचण्यास सांगितली आणि त्यांनी मला अन् यजमानांना त्या वेळच्या गुरुपूजनाची सेवा दिली. आम्हा उभयतांना हे महद्भाग्य लाभले. त्यानंतर पुढील २ – ३ वर्षे मला गुरुपौर्णिमेच्या दिवशी प्रवचन करण्याची सेवा मिळाली.

३ उ. दैनिक ‘सनातन प्रभात’च्या पहिल्या अंकाच्या वितरणाची सेवा मिळणे

३ उ १. गोवा आणि सिंधुदुर्ग आवृत्तीच्या दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वितरणाच्या सेवेच्या निमित्ताने सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रसारासाठी जाणे : २८.३.१९९९  या दिवशी आम्ही कराडचे ५ साधक आधुनिक वैद्या (सौ.) कस्तुरी भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रसारासाठी गेलो. आम्ही ३.४.१९९९ या दिवशी दुपारपर्यंत दोडामार्ग येथे आधुनिक वैद्या (सौ.) शीतल प्रसादी यांच्या प्रवचनाच्या प्रचाराची सेवा केली. प्रवचनानंतर त्यांचे मार्गदर्शन झाल्यावर आम्ही डेगवे येथे गेलो. ४.४.१९९९ या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’चा पहिला अंक प्रसिद्ध होणार होता. आमची उत्सुकता शिगेला पोचली होती. अंक आले आणि लगेचच त्यांचे वितरणही झाले. सर्वांच्या आनंदाला पारावर राहिला नाही. मग आणखी अंक मागितले; पण सर्व अंक संपून गेले होते. अशा प्रकारे आम्हाला दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रथम अंकाच्या वितरणाची सेवा मिळाली.

३ उ २. दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वितरणाच्या सेवेतून मिळणार्‍या आनंदामुळे व्यष्टी साधनेपेक्षा समष्टी सेवेत अधिक आनंद असल्याचे अनुभवणे : दुसर्‍या दिवशी पहाटे आवरून आम्ही कराडला जाण्याची सिद्धता करत असतांना ५.४.१९९९ चे दैनिक ‘सनातन प्रभात’चे अंक वितरणासाठी मिळाले. तेव्हा त्यांचेही वितरण करून आम्ही कराडला परतलो. त्या वेळी ‘आनंदी आनंद गडे’, अशी आमची सर्वांची अवस्था झाली होती. ‘व्यष्टी साधनेपेक्षा समष्टी साधना किती आनंदाची असते !’ याचा अनुभवच आम्ही घेतला.

३ ऊ. कराडबाहेर जाऊन परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सार्वजनिक सभांच्या प्रचाराची सेवा करणे

अशा प्रकारे साधकांच्या सहवासातून आमची समष्टी साधनेची आणि सेवेची तळमळ वाढतच गेली. आम्ही प.पू. गुरुदेवांच्या अभ्यासवर्गात शिकत असतांनाच कोयनानगर, चिपळूण आणि कोल्हापूर अशा कराडच्या बाहेर होणार्‍या परात्पर गुरुदेवांच्या सार्वजनिक सभांच्या प्रचाराची सेवा करू लागलो. तेव्हा पाटण किंवा मसूर अशा ठिकाणी मुक्कामही होऊ लागले.

३ ए. ‘आपल्याला वैयक्तिक प्रगती करून आपल्या देशातील जनतेलाही पुढे न्यायचे आहे’, असे कळल्यावर सेवा अधिक गांभीर्याने चालू होणे

सेवा करत असतांना ‘आध्यात्मिक पातळी म्हणजे काय ? आपली पातळी कशी वाढेल ?’ याविषयी माझे मनन-चिंतन होऊ लागले. ‘पातळी म्हणजे प्रगती’, हे कळले, तरी ‘ती कशी होते ?’ याविषयी माझ्या मनात पुष्कळ उत्सुकता होती. एकदा पुणे येथे प.पू. गुरुदेवांनी ‘संतांची आध्यात्मिक उन्नती मूलाधार चक्रापासून सहस्रारपर्यंत झालेली असते. कालांतराने आपलीही अशी उन्नती होईल; पण आपल्याला तेथेच न थांबता पुन्हा खाली मूलाधार चक्राकडे यायचे आहे; कारण आपल्याला समाज आणि राष्ट्र या सर्वांनाच पुढे न्यायचे आहे’, असे मार्गदर्शन केले. या मार्गदर्शनानंतर ‘विज्ञापने मिळवणे, सनातनच्या सात्त्विक उत्पादनांचे ठिकठिकाणी प्रदर्शन लावणे, घराघरांतून नामपट्ट्यांचे वास्तूछत लावण्याचे महत्त्व सांगणे’, अशा पुष्कळ नवीन सेवा चालू झाल्या.

४. मुलीचा विवाह आणि तिच्या साधनेला आरंभ

४ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने मुलीच्या विवाहाची काळजी दूर होणे

मला प.पू. गुरुदेवांना मुलीच्या (कु. ज्योतीच्या) विवाहाविषयी विचारायचे होते. प.पू. गुरुदेव अनेकदा आधुनिक वैद्य भोसले यांच्याकडे येत होते. तेव्हा मला त्यांची सेवाही करायला मिळायची; पण ‘त्यांना वैयक्तिक प्रश्न विचारायचे नाहीत’, असे सांगितले असल्यामुळे मला मुलीच्या विवाहाविषयी त्यांना विचारता येत नसे. प.पू. गुरुदेवांना तर सर्वच कळत होते. एके दिवशी प.पू. गुरुदेवांनी आधुनिक वैद्य भोसले यांना घाटकोपर येथील संत प.पू. जोशीबाबा यांच्यावर लिहिलेला ग्रंथ दिला. मी तो ग्रंथ वाचल्यावर मला ‘कु. ज्योतीने ठरवल्यानुसार तिचा विवाह करून देणे आवश्यक आहे’, हे लक्षात आले. माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळाले. याच कालावधीत ज्योती ‘एम्.डी.’च्या परीक्षेत उत्तीर्ण झाली. त्यानंतर २२.५.१९९८ या दिवशी तिचा विवाह मिरज येथे झाला. अशा प्रकारे प.पू. गुरुदेवांनी माझ्या नकळत माझी सर्व काळजी दूर केली.

४ आ. मुलीची साधना आणि सेवा चालू होणे

सौ. ज्योतीचे वर्षसण करण्याच्या निमित्ताने आम्ही वारंवार मणिपाल (कर्नाटक) इथे तिच्या घरी जात होतो. तेव्हा मणिपालचे ‘वेणुगोपाल’ मंदिर आणि उडुपी येथील सत्संग येथे आम्ही जात असू. तेथे आम्हाला कन्नड भाषेतील ‘साप्ताहिक सनातन प्रभात’ पहायला मिळत असे. त्यातील चित्रे पाहून विषय लक्षात येत असे. आम्ही मराठीत बोललो, तरी तेथील कन्नडभाषिक साधकांना ते कळत असे. आम्हाला फार मजा वाटायची. आमच्या आनंदात वाढ होत राहिली.

सौ. ज्योतीला १३.५.१९९९ या दिवशी कन्यारत्न (कु. शिवांजली) झाले. त्यानंतर तिचे मंगळुरू येथे स्थानांतर झाले. तिच्या संसाराला स्थिरता लाभली. तिने कन्नड भाषा आत्मसात करून सेवाकेंद्रात जाऊन मराठी साप्ताहिक आणि ग्रंथ यांचे कन्नड भाषेमध्ये भाषांतर करण्याची सेवा चालू केली. आम्हीही तेथील सेवाकेंद्रात जाऊन साधकांच्या ओळखी करून घेऊन आम्हाला जमेल तेवढी सेवा करायचो.

४ इ. सौ. ज्योतीसमवेत लाभलेला परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा सत्संग

आमची मंगळुरू ते कराड अशी सारखी ये-जा चालूच असायची. एक दिवस सौ. ज्योतीला अकस्मात् सुट्टी मिळाल्याने तिने गोव्याला जायचे ठरवले. आम्ही सर्वजण ३०.१.२००२ या दिवशी गोव्याला आलो. तिला सुखसागर येथे प.पू. डॉक्टरांचा सत्संग लाभला. आमच्या आयुष्यातील हा एक अपूर्व दिवस होता. आम्हाला जणू ‘रामराज्य’च अनुभवायला मिळाल्याचा आनंद होत होता.

५. अनिष्ट शक्तींच्या त्रासाचा प्रथम अनुभव !

आम्ही मंगळुरू येथे परत आल्यानंतर कु. शशिकला आचार्य यांनी मंगळुरू येथील साधकांना त्रास देणार्‍या अनिष्ट शक्तींच्या निवारणार्थ काही प्रयोग केले. त्यांनी मला त्या प्रयोगांचे लिखाण करण्यास सांगितले. मी ते करत असतांना हळूहळू मला ‘माझ्या सर्वांगाला मुंग्या चावत आहेत’, असे वाटू लागले. मी अस्वस्थ झाले. प्रत्यक्षात मुंग्या कुठेही दिसत नव्हत्या. तेव्हा ‘हा अनिष्ट शक्तींचाच त्रास आहे’, हे माझ्या लक्षात आले आणि मी नामस्मरण करतच लिखाण पूर्ण करण्याचा निश्चय केला. आश्चर्य म्हणजे त्यानंतर मुंग्या चावणे आपोआप बंद झाले.

६. परात्पर गुरु डॉक्टरांचे अनेक कठीण प्रसंगांत लाभलेले आशीर्वादपर मार्गदर्शन

वर्ष २००२ च्या आरंभी सौ. ज्योतीला अकस्मात् थंडी वाजून ताप येऊ लागला. ती लगेच मंगळुरूहून कराडला आली. तिला औषधांनी फारसा पालट होत नव्हता. तिला प.पू. गुरुदेवांच्या भेटीचा ध्यास लागला होता. गुरुपौर्णिमा जवळ आली होती. अचानक ‘प.पू. गुरुदेव कराडवरून सातार्‍याला जाणार आहेत’, असे आम्हाला कळले. कराड येथील उत्तरदायी साधकांची अनुमती मिळून आमची प.पू. गुरुदेवांशी मुख्य राष्ट्रीय महामार्गावर (हायवेवर) भेट होऊ शकली. प.पू. गुरुदेवांनी सौ. ज्योतीला तिच्या प्रश्नांची उत्तरे दिली. तिच्या शंकांचे समाधान झाले. अशा अनेक प्रसंगांत आम्हाला प.पू. गुरुदेवांकडून मार्गदर्शन मिळायचे.

(क्रमश:)

– आपली एक सेविका,

(पू.) श्रीमती विजयालक्ष्मी काळे, पुणे. (१०.३.२०२०)

सनातन संस्थेच्या सर्व संतांच्या साधनाप्रवासावर आधारित ग्रंथ प्रकाशित करण्यासाठी सर्व संतांनी स्वतःच्या संदर्भातील, तसेच वाचक अन् साधक यांनी संत आणि संतांच्या अनुभूतींच्या संदर्भातील लिखाण लवकरात लवकर पाठवावे !

‘सनातनच्या संतांच्या लिखाणातून सर्वांना आनंद मिळावा, तसेच त्यांच्या साधनाप्रवासातून सर्वांना शिकता यावे’, यासाठी सनातन संस्थेच्या सर्व संतांच्या साधनाप्रवासावर आधारित ग्रंथ प्रकाशित करण्यात येणार आहेत. यासाठी सर्व संतांनी स्वत:चे साधनापूर्व जीवन, साधनाप्रवास, त्यांनी साधक आणि जिज्ञासू यांना केलेले वैशिष्ट्यपूर्ण मार्गदर्शन इत्यादी सर्व लिखाण शक्य तितक्या लवकर पाठवावे (यापूर्वी जे लिखाण पाठवले असेल, ते कृपया पुन्हा पाठवू नये.), तसेच वाचक आणि साधक यांनी त्यांना संतांकडून शिकायला मिळालेली सूत्रे आणि संतांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती पाठवाव्यात. लिखाण शक्यतो टंकलेखन करून पाठवावे.

लिखाण पाठवण्यासाठी संगणकीय पत्ता : [email protected]

पोस्टाचा पत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, २४/बी, सनातन आश्रम, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा. ४०३४०१

  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक