साधकांनो, ‘सनातन’चे आणि ‘एस्.एस्.आर्.एफ्.’चे संत हे केवळ संत नाहीत, तर गुरुच असल्याने त्यांच्याकडून शिका अन् तेे कृतीत आणून त्यांचा खर्या अर्थाने लाभ करून घ्या आणि साधनेत शीघ्र गतीने पुढे जा !‘आतापर्यंत सनातनचे आणि सनातनच्या शिकवणीप्रमाणे साधना करणारे एस्.एस्.आर्.एफ्.चे मिळून १११ साधक संत झाले आहेत. यांतील काहीजण ठिकठिकाणी जाऊन साधकांना साधनेसंदर्भात अगदी देहत्याग होईपर्यंत मार्गदर्शन करतात. आपण त्यांना ‘समष्टी संत’ म्हणतो. त्यांचे कार्य गुरूंप्रमाणेच साधनेत मार्गदर्शन करण्याचे आहे; म्हणून त्यांची माहिती सर्व साधकांना व्हावी आणि साधकांना संतांकडून काहीतरी शिकायला मिळावे, यासाठी त्यांच्याविषयीचे जागेनुसार काही लिखाण ‘सनातन प्रभात’मध्ये प्रकाशित करत आहोत. त्या माहितीत काही संत आणि साधक यांनी लिहिलेली संतांची गुणवैशिष्ट्ये, शिकवण, त्यांच्याविषयी साधकांना आलेल्या अनुभूती, त्यांनी स्वतःविषयी, कुटुंबियांविषयी, इतर साधकांविषयी आणि संतांविषयी लिहिलेले लिखाण, त्यांनी केलेल्या कविता किंवा त्यांच्यावर इतर साधकांनी केलेल्या कविता इत्यादी विषयांवर लिखाण आहे. हे लिखाण वाचून त्यांच्याविषयी सर्वांनाच जवळीक वाटण्यास साहाय्य होईल आणि जगभरातील सर्वच साधकांना त्यांची तोंडओळख होईल. संतांची वैशिष्ट्ये केवळ वाचू नका, तर ती स्वतःमध्ये आणण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे या लेखमालेचे खर्या अर्थाने सार्थक होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवलेे |
२३ जुलै २०२१ या दिवशी आषाढ पौर्णिमा अर्थात् गुरुपौर्णिमा आहे. गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या या दिवशी गुरुतत्त्व सहस्र पटींनी कार्यरत असते. या गुरुपौर्णिमेचा साधकांना अधिकाधिक लाभ व्हावा, या दृष्टीने गुरुकृपायोगाच्या माध्यमातून जलद आध्यात्मिक उन्नती करून संतपद गाठलेल्या संतांविषयी लिखाण प्रकाशित करत आहोत.
या लेखमालेत आज आपण सनातनच्या ५८ व्या संत पू. (श्रीमती) विजयालक्ष्मी काळेआजी यांचा सनातन संस्थेशी संपर्क झाल्यानंतरचा पुढील साधनाप्रवास पहाणार आहोत.
(भाग १)
उद्या आषाढ शुक्ल पक्ष चतुर्थी (१४ जुलै २०२१) या दिवशी पू. (श्रीमती) विजयालक्ष्मी काळेआजी यांचा वाढदिवस आहे.
पू. (श्रीमती) विजयालक्ष्मी काळेआजी यांच्या चरणी वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराचा कृतज्ञतापूर्वक नमस्कार !
पू. (श्रीमती) विजयालक्ष्मी काळेआजी यांचा परिचय
पूर्ण नाव : श्रीमती विजयालक्ष्मी विष्णु काळे
वय : ८६ वर्षे
जन्मदिनांक : ५ जुलै १९३५
शिक्षण : एम्.ए.एम्.एड्. (संगीतात बी.ए., हिस्टरी सोशीओलॉजी एम्.ए.)
साधनेला आरंभ : वर्ष १९९७
संतपद कधी : १७.३.२०१६
पू. (श्रीमती) विजयालक्ष्मी काळेआजी यांनी ३३ वर्षे माध्यमिक शिक्षिका म्हणून कन्या शाळा कराड येथे नोकरी केली. इतिहास, भूगोल, इंग्रजी आणि गृहशास्त्र (होम सायन्स) हे विषय त्या शिकवत असत. वर्ष १९९३ मध्ये त्या निवृत्त झाल्या. वर्ष १९९७ पासून त्यांनी सनातन संस्थेच्या मार्गदर्शनाखाली साधनेला आरंभ केला. प्रसारात नामदिंड्या, नैतिकमूल्य प्रवचने, दैनिक वितरण, संकलन, सत्संग घेणे इत्यादी विविध सेवा करत त्यांनी वर्ष २०१० मध्ये ६१ टक्के आध्यात्मिक पातळी प्राप्त केली आणि वर्ष २०१६ मध्ये त्या संतपदी विराजमान झाल्या. सध्या त्या समष्टीसाठी नामजप करण्याची सेवा करतात.
१. सनातन संस्थेशी संपर्क
१ अ. सनातन संस्थेच्या वतीने आयोजित परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सार्वजनिक सभेतील प्रवचनाला जाणे आणि त्यांचे ते प्रवचन फारच आवडणे
मला कराड येथे शिक्षिकेची नोकरी मिळाली. आम्ही कराड येथे रहायला आल्यानंतर मला सनातन संस्थेच्या प्रवचनाचे निमंत्रण मिळाले. १९.५.१९९७ या दिवशी सार्वजनिक (जाहीर) सभेतील प.पू. गुरुदेवांचे प्रवचन मला फारच भावले. मी प.पू. गुरुदेवांना प्रार्थना केली, ‘आता मला किमान २ वर्षे तरी कुठे जावे लागू नये. मला इथेच स्थिर ठेवा.’ प.पू. गुरुदेवांनी माझी प्रार्थना ऐकली आणि त्यांनी मला या साधनेत स्थिर केले.
१ आ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रथम दर्शनाच्या वेळी आलेली अनुभूती !
हळूहळू कराडमधील फडके, आधुनिक वैद्य भोसले इत्यादी साधकांशी माझ्या ओळखी झाल्या. विटा येथे प.पू. गुरुदेवांचे प्रवचन होते. त्यासाठी आम्ही सर्व साधक कराडहून गाडी करून विटा येथे गेलो. दिवसभर अनेकांच्या भेटी घेऊन रात्री आम्ही सभागृहात जाऊन बसलो. थोड्याच वेळात प.पू. गुरुदेव आले. ते त्यांच्या आसंदीकडे जात असतांनाच गार वार्याचा एक मोठा झोत माझ्या अंगावरून गेला. ते आसंदीत बसल्यानंतर त्यांच्याकडे पहाताच ‘त्यांच्याकडून पिवळ्या प्रकाशाचा मोठा झोत माझ्या अंगावर येत आहे’, असे मला जाणवले. मी अनेकदा तो पुसण्याचा, दूर घालवण्याचा किंवा स्वतः त्यापासून बाजूला होण्याचा प्रयत्न केला; पण संपूर्ण प्रवचन संपेपयर्ंत तो माझ्या अंगावरून मुळीच बाजूला गेला नाही.
अशी अनुभूती देणारे प्रवचन मी आयुष्यात प्रथमच ऐकले. त्यामुळे माझी सनातनवर निष्ठाच बसली.
२. साधनेला आरंभ
त्यानंतर मी प.पू. भक्तराज महाराज यांची भजने ऐकणे, नामजप करणे, सत्संगाला जाणे इत्यादी करू लागले. अशा प्रकारे माझा सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधनेला आरंभ झाला. कुलदेवतेच्या उपासनेची मला आधीपासूनच आवड होती. मी पुन्हा कुलदेवतेचा नामजप करण्यास आरंभ केला. ‘ठिकठिकाणी होणार्या कोपरा सभा, ज्येष्ठ साधकांची प्रवचने आणि साप्ताहिक सत्संग’ इत्यादी ठिकाणी मी जाऊ लागले.
२ अ. साधनेत आल्यावर आलेली वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती
२ अ १. एकदा स्वप्नात पुष्कळ पूर्वज दिसल्याने मन अस्थिर होणे : मी साधनेला आरंभ केल्यानंतर एका मासाने मला एक स्वप्न पडले. स्वप्नात मला मी एका आगगाडीत बसल्याचे दिसले. थोड्याच वेळात आमचे अनेक पूर्वज दाटीवाटी करून मी बसलेल्या डब्यात शिरलेे. त्यांच्यामुळे सर्व आगगाडी भरली. तेवढ्यात माझा दिवंगत झालेला मोठा भाऊ कै. दामोदरही मला तेथे दिसला. त्याने हिमालयात राहून साधना करून संतपद प्राप्त केले होते. मी त्याला विचारले, ‘अरे, तू इथे कसा आलास ?’ तो म्हणाला, ‘मी आता इथेच आलो आहे.’ आगगाडी एका ठिकाणी थांबली. अनेक लोक खाली उतरू लागले. मी त्यांना विचारले, ‘अरे, तुम्ही निघालात कसे ? आपले गुरुदेव तर गाडीतच आहेत. आपण त्यांचे पूजन करूया.’ असे म्हणून मी फुलांचा एक मोठा हार घेऊन प.पू. गुरुदेवांना घालू लागले आणि मला जाग आली. या स्वप्नामुळे माझे मन बेचैन होऊन अस्थिर झाले.
२ अ २. प.पू. गुरुदेवांनी पूर्वजांना मुक्ती देण्यासाठी प्रतिदिन ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप ९ माळा करण्यास सांगणे, त्यानंतर स्वप्नात पूर्वज दिसणे बंद होणे : वरील स्वप्नानंतर ‘प.पू. गुरुदेवांची प्रवचने (सार्वजनिक सभा) कुठे आहेत ?’ याची चौकशी करून मी आणि यजमान सांगली आणि मिरज येथेही गेलो. मिरज येथील सभेत माझी पू. (सौ.) सखदेवआजी (सद्गुरु (सौ.) सखदेवआजी) यांच्याशी भेट झाली. त्यांनी मला प्रवचनानंतर शंकानिरसन होणार असलेले ठिकाण सांगितले. आम्ही दोघे तेथे गेलो. यजमानांच्या धाडसामुळेच मी तेथे शंका विचारू शकले. कु. शशिकला आचार्य आणि आधुनिक वैद्या (सौ.) नंदिनी सामंत यांनी माझे शंकानिरसन केले. तेव्हा प.पू. गुरुदेवांनी मला ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप प्रतिदिन ९ माळा करून तुम्ही तुमच्या पूर्वजांना मुक्ती द्या आणि भगीरथ बना’, असा आशीर्वाद दिला. त्यानुसार मी दत्ताचा नामजप चालू केला. त्यानंतर मला स्वप्नात पूर्वज दिसणे बंद झाले. प.पू. गुरुदेवांच्या कृपेने मी अद्यापही ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप प्रतिदिन ९ माळा करत आहे.
(क्रमश:)
– आपल्या कृपाशीर्वादाने घडलेला साधना प्रवास भोगलेली आपली एक सेविका,
(पू.) श्रीमती विजयालक्ष्मी काळे, पुणे. (१०.३.२०२०)
या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/494631.html
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |