१. स्वप्नात देवाने सद्गुरु राजेंद्र शिंदे यांच्या माध्यमातून वेळेचे गांभीर्य लक्षात आणून देणे
‘१४.९.२०२४ या दिवशी रात्री मला स्वप्नात दिसले, ‘मी नातेवाइकांशी मायेतील विषयांवर बोलत आहे. मी त्या विषयांत वहावत चालले आहे. त्याच वेळी तेथे सद्गुरु राजेंद्र शिंदे आले. त्यांनी मला सांगितले, ‘गुरुपौर्णिमेनिमित्त सत्संग आहे.’ ते असे सांगून निघून गेले.’ त्यानंतर लगेचच मी भानावर आले. तेव्हा ‘माझा वेळ वाया जाऊ नये’, याची माझ्यापेक्षा देवालाच काळजी आहे. त्याने मला त्याची स्वप्नातही जाणीव करून दिली’, त्याबद्दल मला पुष्कळच कृतज्ञता वाटली. ‘देव माझ्या समवेत आहे’, हे मला अनुभवता आले
२. स्वभावदोष दूर करण्यासाठी सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी केलेले साहाय्य
एकदा मी सकाळी स्वयंपाकघरात सेवा करत असतांना २ – ३ प्रसंगांत मोठ्या आवाजात बोलले. तेव्हा माझी चिडचिड होत होती. त्या वेळी साधकांनी मला माझ्यामधील स्वभावदोषांची जाणीव करून दिली. त्या वेळी तेथे सद्गुरु राजेंद्रदादा आले होते. त्यांनी मला सांगितले, ‘‘दीर्घ श्वास घ्या आणि सोडा.’’ तेव्हा ‘माझ्याकडून काहीतरी गडबड झाली आहे’, हे माझ्या लक्षात आले. त्यानंतर मी सद्गुरु दादांनी सांगितल्याप्रमाणे लगेच प्रार्थना केली आणि दीर्घ श्वास घेतला. तेव्हा मी लगेच शांत झाले. मी लगेच संबंधित साधकांची क्षमा मागितली.
मी सद्गुरु दादांना याविषयी सांगितल्यावर त्यांनी सांगितले, ‘‘अशा वेळी प्रार्थना करून स्वतःवर नियंत्रण ठेवायला हवे.’’
३. कृतज्ञता आणि प्रार्थना
‘देव माझ्या समवेत आहे’, हे मला अनुभवता आले. गुरुमाऊलीच्या कृपेने मला सद्गुरु आणि संत यांच्या सहवासात साधना करण्याची संधी मिळत आहे. त्यामुळे मला स्वभावदोषांवर मात करण्यासाठी बळ मिळत आहे. ‘सद्गुरु आणि संत यांचा मला आध्यात्मिक स्तरावर लाभ करून घेता येऊ दे’, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते.’
– सौ. विमल विलास गरुड, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२६.१०.२०२४)