रुग्णचिकित्सा अन् औषधीकरण यांत तज्ञ असणारे आणि ‘आयुर्वेद ईश्वरप्राप्तीसाठी आहे’, हे मूळ तत्त्व लक्षात घेऊन सतत साधनारत रहाणारे मोर्डे (रत्नागिरी) येथील पू. वैद्य विनय भावे (वय ६९ वर्षे) !
२५.६.२०२१ या दिवशी सनातनचे ३५ वे संत पू. वैद्य विनय भावेकाका (वय ६९ वर्षे) यांनी मोर्डे, जिल्हा रत्नागिरी येथे देहत्याग केला. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘वैद्यकीय सेवा ही साधना म्हणून कशी करावी ?’, हे आम्हाला पू. वैद्य विनय भावे यांच्या माध्यमातून शिकवले, तर ‘बाहेर प्रतिकूल परिस्थिती असतांनाही अंतर्मनामध्ये साधना कशी चालू ठेवावी ?’, हे पू. वैद्य विनय भावे (पू. भावेकाका) यांनी आम्हाला त्यांच्या आचरणातून शिकवले. सनातनच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमात वैद्यकीय सेवा करणार्या वैद्या (कु.) अपर्णा महांगडे यांना शिकायला मिळालेली सूत्रे येथे दिली आहेत.
१. परंपरागत मिळालेला आयुर्वेदाचा वारसा उत्तम प्रकारे जोपासणे
पू. भावेकाकांचे वडील आणि आजोबा हेही वैद्य अन् औषधनिर्मितीचे उत्तम जाणकार होते. पू. भावेकाकांचे वडिलोपार्जित औषधनिर्मितीचे उद्योगालय (कारखाना) होते. पू. भावेकाकांनी त्या काळी ‘आयुर्वेदाचार्य’ ही पदवी मिळवली होती. त्यानंतर ते पू. अण्णा करंदीकर (डहाणू) यांच्याकडे आयुर्वेदाचे शिक्षण घ्यायला जात असत. रुग्णालयाच्या पायर्यांवरून रुग्ण वर येत असतांना त्याच्या पावलांच्या होणार्या आवाजावरूनच पू. अण्णा करंदीकर त्या रुग्णाची व्याधी ओळखत असत. ‘पू. भावेकाकांना त्यांच्याकडूनच सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता प्राप्त झाली असावी’, असे मला वाटते.
२. कौशल्य
२ आ १. औषधीकरण : ‘आयुर्वेदाची औषधे सिद्ध करणे’, हे कौशल्याचे आणि वेळ लागणारे काम आहे. पू. भावेकाकांना ते कौशल्य सहजसाध्य होते.
२ आ २. रुग्णचिकित्सा : पू. भावेकाकांची रुग्णचिकित्सेमध्ये हातोटी होती. लोक त्यांच्याकडे पुष्कळ दुरून चिकित्सेसाठी येत असत. रामनाथी आश्रमातील साधकांनाही त्यांनी दिलेल्या औषधांचा लाभ होत असे. अनेक वेळा पू. भावेकाका रुग्ण न तपासताच त्याला होणारा त्रास ऐकून औषध द्यायचे आणि ती औषधे घेतल्यावर रुग्णाला बरे वाटायचे.
२ आ २ अ. अनुभूती : ‘माझ्या उजव्या पायाच्या अंगठ्याला ‘ओले इसब’ (Wet Eczyma) झाले होते. त्यासाठी आध्यात्मिक स्तरावरील उपाय आणि थोडे औषधही चालू होते. दोन मास होऊनही ते बरे होत नव्हते; म्हणून मी ते पू. भावेकाकांना सांगितले. त्यांनी मला औषध सांगितले आणि ‘बरे होईल’, असे म्हटले. दुसर्या दिवशी सकाळी औषध घेण्यापूर्वीच ती जखम सुकली. त्यानंतर परत आतापर्यंत मला त्याचा कधी त्रास झाला नाही.
(‘पू. भावेकाका संत असल्यामुळे एखाद्याला औषध देतांना ‘तो बरा व्हावा’, हा त्यांचा संकल्प कार्यरत व्हायचा. त्यामुळे रुग्ण आधीच बरा व्हायचा.’ – संकलक)
३. औषधनिर्मितीचा व्यवसाय असूनही अतिशय तत्त्वनिष्ठतेने औषधे सिद्ध करणारे कर्मयोगी !
३ अ १. ग्रंथात सांगितल्यानुसारच औषधीकरण करणे
अ. एखादे औषध बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल मिळत नसला, तर पू. भावेकाका कधीही पर्यायी कच्चा माल अथवा भेसळ करायचे नाहीत. ‘औषध बाजारात विलंबाने गेले, तरी चालेल’, असे ते म्हणायचे.
आ. ते औषधीकरण करतांना सुवेर-सूतक-शौचादी सर्व नियमांचे पालन करत असत. त्यांचे वय आणि शारीरिक स्थिती नसतांनाही ते ग्रहण किंवा यज्ञ यांतील सर्व नियमांचे पालन करत असत.
इ. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही औषधीकरण करायचो, तेव्हा त्यांनी धन्वन्तरि देवतेचा मंत्र ऐकायला सांगितला.
ई. त्यांचा ग्रंथामध्ये दिल्याप्रमाणे शास्त्रोक्त पद्धतीनेच औषधे करण्याविषयी आग्रह असायचा. ग्रंथात औषध घोटण्याचा कालावधी अधिक असतो. काही वैद्य औषधे अल्प वेळा घोटतात; पण पू. भावेकाका कधीही तसे करायचे नाहीत.
उ. पू. भावेकाका अनेक महाग औषधे, जसे सुवर्णकल्प किंवा अनेक दुर्मिळ वनस्पती असलेले तेल सिद्ध करायचे.
३ अ २. पू. भावेकाकांच्या मार्गदर्शनाखाली सिद्ध केलेल्या औषधांचे ‘यू.ए.एस. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’द्वारे निरीक्षण करणे, त्या नोंदी सकारात्मकता दर्शवत असणे : वरील कारणांमुळे त्यांच्या औषधांचा परिणामही लगेच जाणवायचा. त्यांनी सांगितल्याप्रमाणे सनातन संस्थेच्या अंतर्गत औषधांची निर्मिती केल्यावर त्याचे तुलनात्मक ‘यू.ए.एस.’ (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर) द्वारे परीक्षण केले. तेव्हा गंधर्व हरितकी आणि लघूसुतशेखर या औषधांचे निरीक्षण सकारात्मक आले, तर अन्य उद्योगालयांनी केलेल्या त्याच औषधांचे निरीक्षण नकारात्मक आले.
४. इतरांना साहाय्य करून समाजऋण फेडणार्या पू. भावेकाकांना त्यांच्या निःस्वार्थ सेवेसाठी ‘रायगड भूषण’ हा पुरस्कार मिळणे
अ. सरकारी तलाठी गावामधील गरीब कामगारांना फसवून त्यांची भूमी कह्यात घेत असत. तेव्हा पू. भावेकाका त्यांच्याविरुद्ध दावा करून गरिबांना साहाय्य करायचे. त्यांच्यामध्ये इतरांना साहाय्य करण्याची आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची सहजप्रवृत्ती होती.
आ. ते उच्च वर्गीय, उच्चशिक्षित आणि प्रतिष्ठित असूनही गावातील आदिवासी लोकांना आपल्या घरातील सदस्याप्रमाणे प्रेम देत होते. ते त्यांच्याकडून औषधनिर्मितीसाठी लागणारा कच्चा माल आनंदाने घ्यायचे आणि त्यांना साहाय्यही करायचे.
इ. ‘कोकण प्रांतातील वैद्यांना औषधनिर्मितीत एकमेकांना साहाय्य व्हावे’, यांसाठी पू. भावेकाकांनी कोकण प्रांतातील वैद्यांच्या समवेत एक समिती नेमली होती.
पू. भावेकाकांना त्यांच्या या निःस्वार्थ सेवेसाठी ‘रायगड भूषण’ हा पुरस्कार प्राप्त झाला होता.
ई. पू. भावेकाकांनी ‘श्री वैजनाथ एंटरप्राइजेस’ हे बाटलीबंद पिण्याचे पाणी सिद्ध करण्याचे उद्योगालय चालू केले होते. नंतर पू. भावेकाका रामनाथी आश्रमात वास्तव्याला आले होते. पू. भावेकाकांच्या पत्नीला ते सर्व नवीन असल्याने काकूंना उद्योगालय चालवतांना पुष्कळ अडचणी यायच्या. तेव्हा पू. भावेकाका रामनाथी येथूनच काकूंना मार्गदर्शन करायचे.
५. सेवाभाव
१. ते महाशिवरात्रीला गावातील शिवमंदिरामध्ये गावकर्यांसाठी साबुदाण्याची खिचडी करायचे. पू. काका या वयातही केवळ या उत्सवासाठी गोव्याहून रायगड येथील त्यांच्या घरी जात होते.
२. कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्यावर ‘सनातनच्या एकाही साधकाला कोरोनाची लागण व्हायला नको’, अशी त्यांची तळमळ होती. त्यासाठी त्यांनी औषधे सांगितली. त्यांना ‘एखादा साधक रुग्णाईत आहे’, असे कळल्यावर ते त्याची वारंवार विचारपूस करायचे. ‘श्री गुरूंनी मला साधकांचे आरोग्य चांगले ठेवण्याची सेवा दिली आहे’, असा त्यांचा भाव असायचा.
६. पू. भावेकाकांनी केलेली साधना
६ अ १. सप्तशती पाठ अन् भागवत सप्ताह करणे आणि त्यातील अनेक गोष्टी साधकांना सांगून त्यांच्या अडचणी सोडवणे : पू. भावेकाका नियमित भागवत सप्ताह आणि सप्तशती पाठ यांचे वाचन करत असत. ते नियमित धन्वन्तरि यागही करत होते. ते जे वाचन करत, त्यातील साधनेसाठी उपयुक्त भागाचे ते सतत चिंतन करायचे आणि ते चिंतन इतरांनाही सांगायचे, उदा. ‘देवीमहात्म्य किंवा भागवतातील अनेक गोष्टी सांगून साधनेच्या दृष्टीने त्यातून काय बोध घ्यायला पाहिजे ?’, हे ते आम्हाला सांगायचे. अनेक साधक त्यांना स्वतःच्या अडचणी सांगायचे. तेव्हाही ते यातील उदाहरणे देऊन त्यांच्या अडचणी सोडवायचे. त्यामुळे साधकांना त्यांचा आधार वाटायचा.
६ अ २. आरत्या म्हणतांना किंवा हरिपाठ करतांना ते केवळ कर्मकांड म्हणून न करता त्यातून ‘पू. भावेकाका भगवंताला अनुभवत होते’, असे जाणवणे : मला दोन वेळा त्यांच्या घरी जाण्याची संधी मिळाली. सकाळी पूजा झाल्यावर पू. भावेकाका देवघर पहायचे आणि पूजेतील त्रुटी सांगायचे. सायंकाळी ते अनेक आरत्या आणि हरिपाठ म्हणत असत. तेव्हा पू. भावेकाका ते कर्मकांड रूपाने न करता ‘प्रत्यक्ष देवाला अनुभवत त्याचा आनंद घेत आहेत’, असे जाणवायचे.
६ अ ३. संसारात राहून सर्व कर्तव्ये पूर्ण करणे, वैद्यकीय ज्ञान आणि औषधीकरण यांत तज्ञ असूनही त्यात न अडकता साधनेचे महत्त्व जाणून साधना करणे : शुद्ध औषधे निर्माण करणे, उत्तम चिकित्सा आणि परंपरागत वैद्य असल्यामुळे पू. भावेकाकांची अनेक वैद्यांशी ओळख अन् जवळीक होती. आयुर्वेदाच्या क्षेत्रामध्ये पू. भावेकाकांची मोठी ख्याती होती. ते औषधनिर्मितीच्या क्षेत्रात तज्ञ होते. त्यांना हवे, तर ते अनेकांना शिकवू शकले असते आणि आयुर्वेदात आणखी पुढे गेले असते; पण असे असतांनाही ते आयुर्वेदाच्या क्षेत्रात अडकून राहिले नाहीत. त्यांनी स्वतःला आयुर्वेद, संसार किंवा औषधनिर्मिती यांत मर्यादित ठेवले नाही. हे सर्व करतांना त्यांनी याच जन्मामध्ये स्वतःचा उद्धार करून घेण्यासाठी साधनाही केली. ते वर्षातून केवळ काही मास घरी जायचे. घरातील सर्व कर्तव्ये पूर्ण करत त्यांनी आध्यात्मिक प्रगती केली आणि ते संतपदावर विराजमानही झाले. संत तुकाराम महाराज यांच्याप्रमाणे संसारात राहून साधना करत ते देवाशी एकरूप झाले होते.
६ अ ४. देवाच्या सतत अनुसंधानात असणे : ते एकटे असतांना भजने म्हणत असत. त्यांचा नामजपही नेहमी चालू असे. त्यावरून ‘ते सतत देवाच्या अनुसंधानात आहेत’, असे लक्षात यायचे. ते नेहमी सहजावस्थेत असायचे.
७. पू. भावेकाकांची जाणवलेली अन्य आध्यात्मिक वैशिष्ट्ये
अ. त्यांच्यापाशी असलेले ज्ञान ते सहजतेने सर्वांना आणि अनेक वेळा सांगायलाही सिद्ध असत. त्यांनी काहीही लपवून ठेवले नाही.
आ. आयुर्वेदातील पुष्कळ अनुभव असूनही त्यांनी आयुर्वेद निर्माण करणार्या ईश्वराच्या प्राप्तीसाठी प्रयत्न केले. समाजात आयुर्वेदाच्या क्षेत्रात सेवा करणार्या वैद्यांसाठी ते उपदेशपर लेख लिहिणार होते. त्या लेखामध्ये त्यांनी ‘आयुर्वेद हा उपवेद असून त्याचा उद्देश ईश्वरप्राप्ती आहे. आयुर्वेदाचे तात्त्विक ज्ञान किंवा प्रसिद्धी यांमध्ये न अडकता वैद्यांनी याच जन्मात ईश्वरप्राप्तीच्या अंतिम उद्देशापर्यंत वाटचाल करावी’, असे लिहिले होते; मात्र तो लेख पूर्ण होऊ शकला नाही. त्यांनी आम्हाला त्यातील सारांश सांगितला होता.
८. कृतज्ञता
गुरुवर्य पू. वैद्य विनय भावे यांच्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच राहील. देवाने गुरुदेवांचे धन्वन्तरितत्त्व आम्हाला पू. भावेकाकांच्या माध्यमातून मार्गदर्शनासाठी दिले होते. यासाठी मी ईश्वराच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’
– वैद्या (कु.) अपर्णा महांगडे, सनातन आश्रम, गोवा (२६.६.२०२१)
|