१५ मासांच्या कालावधीनंतर कोल्हापूर-कर्णावती (गुजरात) रेल्वे प्रारंभ !

प्रतिकात्मक छायाचित्र

कोल्हापूर – दळणवळण बंदीमुळे मार्च २०२० पासून बंद असलेली कोल्हापूर-कर्णावती (गुजरात) रेल्वे अखेर १० मार्चपासून चालू झाली आहे. ही रेल्वे बंद असल्याने सामान्य नागरिक, व्यापारी, उद्योजक अशा सर्वच वर्गाला त्याचा फटका बसत होता. रेल्वे चालू झाल्याच्या स्वागतार्थ ‘रेल्वे रोड पॅसेंजर्स असोसिएशन’च्या वतीने रेल्वेचे पूजन करण्यात आले, रेल्वेला पुष्पहार घालण्यात आला, तसेच श्रीफळ वाढवून पेढे वाटण्यात आले. या वेळी ‘असोसिएशन’चे अध्यक्ष शिवनाथ बियाणी, जयेश ओसवाल, रवि सरदार, संजय नाझरे, दत्ता सावंत, राजेंद्र मगदूम, उपस्थित होते. प्रारंभी ही रेल्वे आठवड्यातून एक दिवस धावणार आहे.

प्रदीर्घकाळ बंद असलेल्या कोल्हापूर-मुंबई कोयना एक्सप्रेसचा प्रारंभ !

प्रदीर्घकाळ बंद असलेली कोल्हापूर-मुंबई कोयना एक्सप्रेस चालू झाली आहे. यामुळे मुंबई-पुणे येथे जाणार्‍या प्रवाशांची सोय झाली आहे. कोल्हापूर रेल्वे स्थानकावरून ही गाडी प्रतिदिन सकाळी ७.५५ वाजता रवाना होते, तर रात्री ८.१५ वाजता मुंबई रेल्वेस्थानकावर पोचते. केवळ आरक्षण केलेल्या प्रवाशांनाच या रेल्वेतून प्रवास करता येणार आहे.