औंढा नागनाथ (नांदेड) येथे चारचाकी वाहनातील आई आणि मुलगा पाण्यासमवेत वाहून गेले !

  • हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांत मुसळधार पाऊस

  • कापरवाडी (नांदेड) येथे नाल्यात मुलगा वाहून गेला, तर वीज अंगावर पडल्याने २ शेतकर्‍यांचा मृत्यू !

संभाजीनगर – नांदेड, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांत ११ जुलै या दिवशी मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे तिन्ही जिल्ह्यांतील रस्ते जलमय झाल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. औंढा नागनाथ तालुक्यातील असोला ते गोळेगाव मार्गावरील पुलावरून वहाणार्‍या पुराच्या पाण्यात एक चारचाकी वाहन वाहून गेले. या वाहनातील येथील रहिवासी योगेश पडोळ आणि रामदास शेळके यांना पोलीस तसेच गावकरी यांनी वाचवले, तर योगेश यांची पत्नी वर्षा अन् मुलगा श्रेयन हे दोघे वाहून गेले आहेत. या दोघांचा शोध चालू आहे.

नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात कापरवाडी येथे मुसळधार पाऊस पडल्यामुळे साईनाथ लांडगे हा नाल्यात वाहून गेला, तर कंधार तालुक्यातील गणातांडा येथील शेतकरी दिनेश पवार आणि माहूर तालुक्यातील अंजनी येथील शेतकरी आकाश कुरसंगे  यांच्या अंगावर वीज पडल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे.