मृत रुग्णावर दोन दिवस उपचार करून आर्थिक फसवणूक करणारे आधुनिक वैद्य योगेश रंगराव वाठारकर यांना अटक !

‘मृताच्या टाळूवरील लोणी खाण्याची’ वृत्ती असणार्‍या अशा आधुनिक वैद्यांना कठोर शिक्षा होणे अपेक्षित आहे, तरच अशा प्रकारे अन्य कुणी कृत्य करण्यास धजावणार नाही !

(प्रतिकात्मक छायाचित्र)

ईश्वरपूर (जिल्हा सांगली), ८ जुलै – मृत रुग्णावर दोन दिवस उपचार करून आर्थिक फसवणूक करणारे ‘आधार हेल्थ केअर’चे आधुनिक वैद्य योगेश रंगराव वाठारकर यांना ७ जुलै या दिवशी अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी कासेगाव येथील आचारी सलीम हमीद शेख यांनी तक्रार दिली होती.

१. आधुनिक वैद्य योगेश रंगराव वाठारकर यांच्या रुग्णालयात गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार केले जातात. २४ फेब्रुवारी या दिवशी सलीम शेख यांनी त्यांची आई सायरा (वय ६० वर्षे) यांना उपचारांसाठी ‘आधार हेल्थ केअर’मध्ये भरती केले.

२. रुग्ण सायरा यांचा उपचार चालू असतांना ८ मार्च या दिवशी सकाळी ११.४५ वाजता मृत्यू झाला. ही माहिती आधुनिक वैद्य योगेश यांनी सायरा यांच्या मुलापासून लपवली आणि मृतदेहावरच उपचार चालू ठेवले. दोन दिवसांनी आधुनिक वैद्य योगेश यांनी सलीम शेख यांना ही माहिती दिली.

३. यानंतर सलीम यांना १० मार्चअखेर उपचार केल्याचे देयक ४१ सहस्र २८९ इतके झाल्याचे सांगून ते भरून घेतले. या संदर्भात सलीम शेख यांना संशय आल्याने त्यांनी अधिक माहिती घेतली असता सायरा शेख यांचा ‘आधार हेल्थ केअर’मध्ये उपचाराच्या कालावधीत ८ मार्च या दिवशी मृत्यू झाल्याची नोंद ईश्वरपूर नगर परिषदेच्या कागदपत्रांत असल्याचे समजले. त्यामुळे आईचा मृत्यू १० मार्च या दिवशी नाही, तर ८ मार्च या दिवशी झाल्याचे सलीम यांच्या लक्षात आले. यानंतर सलीम यांनी आधुनिक वैद्य योगेश रंगराव वाठारकर यांच्या विरोधात तेव्हा तक्रार दिली होती. या प्रकरणी अधिक अन्वेषण होऊन आधुनिक वैद्य योगेश यांच्यावर भारतीय दंड विधान कलम ४०६, ४२०, ४६४, २९७ प्रमाणे गुन्हा नोंद होऊन त्यांना अटक करण्यात आली आहे.