आईची हत्या करणारा आरोपी सुनील रामा कुचकुरवी याला मरेपर्यंत फाशी

  • नैतिकतेचे अध:पतन झाल्याचे परमोच्च टोक !
  • समाजातील आसुरी वृत्ती बळावत चालल्याचे, हे उदाहरण आहे. यामध्ये पालट होण्यासाठी समाजाला धर्मशिक्षण देणे आवश्यक हे.
(प्रतिकात्मक छायाचित्र)

कोल्हापूर, ८ जुलै – मद्यपान करण्यासाठी पैसे न देणार्‍या आईची हत्या करून तिच्या शरिरातील हृदय, यकृत, आतडी, कोथळा असे अवयव कापून ते भाजून खाण्याच्या सिद्धतेत असलेला आरोपी सुनील रामा कुचकुरवी (वय ३५ वर्षे) याला जिल्हा सत्र न्यायाधीश महेश जाधव यांनी ८ जुलै या दिवशी मरेपर्यंत फाशीची शिक्षा ठोठावली. या प्रकरणी अधिवक्ता विवेक शुक्ल यांनी सरकारी वकील म्हणून काम पाहिले, तर गुन्ह्याचे अन्वेषण तत्कालीन शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी केले होते.

२८ ऑगस्ट २०१७ या दिवशी माकडवाला वसाहतीत आरोपी सुनील कुचकोरवी याने आई मद्यपान पिण्यासाठी पैसे देत नाही या कारणावरून चाकू, सुरी आणि सत्तूर या हत्यारांनी आईच्या अंगावर ठिकठिकाणी वार केले. यानंतर आरोपीने आईच्या शरिराची उजवी बाजू पूर्णपणे कापून शरिरातील हृदय, यकृत, आतडी, कोथळा असे अंतर्गत अवयव बाहेर काढून ते स्वयंपाकघरात ठेवले होते. या अवयवासमवेत त्याने तेल, चटणी, मीठ ठेवले होते. आरोपी सुनील याच्या तोंडास रक्त लागले होते. ही घटना परिसरातील नागरिकांना कळताच त्यांनी आरोपीला घरातच धरून ठेवले होते. त्यानंतर त्याला शाहूपुरी पोलिसांच्या कह्यात देण्यात आले.

या प्रकरणी १२ साक्षीदार तपासण्यात आले. हत्येच्या गुन्ह्यात कोणताही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसतांना न्यायालयाने परिस्थितीजन्य पुराव्यावरून आरोपीस हत्येच्या गुन्ह्यात दोषी ठरवत मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली.