दोन दिवसांचे पावसाळी अधिवेशन गोंधळात संपले; नागपूर येथे ७ डिसेंबरला हिवाळी अधिवेशन !

मुंबई, ७ जुलै (वार्ता.) – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत अल्प कालावधीचे राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचे ६ जुलै या दिवशी सूप वाजले. ५ आणि ६ जुलै या २ दिवसांच्या अधिवेशनात १० घंटे १० मिनिटांचे कामकाज झाले,  तर १ घंटा २५ मिनिटांचा वेळ वाया गेला. सभागृहात १२ विधेयके मांडण्यात आली. पैकी ९ विधेयके संमत केली, तर ४ शासकीय ठराव संमत केले, तसेच नियम ४३ अन्वये २ निवेदने संमत करण्यात आली. येत्या ७ डिसेंबरपासून नागपूर येथे हिवाळी अधिवेशन होणार असल्याची घोषणा विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी केली.

कोरोनाच्या सावटाखाली महाविकास आघाडी सरकारचे हे चौथे अधिवेशन होते. संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांच्या अध्यक्षतेखाली हे अधिवेशन पार पडले. आघाडी सरकारने अधिवेशनाचा कालावधी २ दिवसांचा ठेवल्याने विरोधकांनी त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केल्या. मराठा आरक्षण, ‘ओबीसी’ समाजाचे राजकीय आरक्षण, भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन या सूत्रांवरून विरोधकांनी पहिल्या दिवसापासून आक्रमक पवित्रा घेतला होता.

राज्यात महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यापासून २ दिवसांचे पावसाळी अधिवेशन पकडून एकूण ८ अधिवेशने झाली. ७ अधिवेशनांचा कालावधी केवळ ३६ दिवस इतका आहे. हिवाळी अधिवेशनाचा समावेश केल्यानंतर अधिवेशनाचा एकूण कालावधी एकूण ३८ दिवसांचा आहे.