सध्याचे मेकॉले प्रणित उच्चशिक्षण मुलांना कणखर बनवत नाही, हे सिद्ध करणारी घटना ! येणारा आपत्काळ याहूनही गंभीर परिस्थिती घेऊन येणार आहे. यामध्ये आत्मबळ टिकून रहाण्यासाठी साधनाच अपरिहार्य आहे.
पुणे, ४ जुलै (वार्ता) – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एम्.पी.एस्.सी.) परीक्षेत उत्तीर्ण होऊनही दीड वर्ष झाले तरी प्रत्यक्ष नोकरी मिळत नसल्याचा तणाव आणि आर्थिक अडचणी यांमुळे आलेल्या नैराश्यातून स्वप्नील सुनील लोणकर या तरुणाने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना ३० जून या दिवशी दुपारी ४ वाजता फरसुंगी येथील गंगानगर येथे त्याच्या रहात्या घरी घडली. हडपसर पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
स्वप्नील स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी प्राप्त करून एम्.पी.एस्.सी.च्या वर्ष २०१९ च्या पूर्व आणि मुख्य परीक्षेत, तसेच वर्ष २०२० च्या पूर्व परीक्षेतही उत्तीर्ण झाला होता. मुलाखत रखडल्याच्या तणावामुळे आत्महत्या केल्याचे मृत्यूपूर्वीच्या चिठ्ठीत त्याने लिहून ठेवले आहे. यामध्ये ‘मी घाबरलो किंवा खचलो नाही. फक्त मी अल्प पडलो. माझ्याकडे वेळ नव्हता. एम्.पी.एस्.सी. मायाजाल आहे. यामध्ये पडू नका’, असेही त्याने लिहिले आहे.