सोलापूर – येथे मराठा समाजातील युवकांना रहित झालेले आरक्षण पुन्हा मिळावे, या मागणीसाठी मराठा समाजाच्या वतीने आक्रोश मोर्चा काढण्यात आला. आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा पार पडला. मोर्चाला पोलिसांनी अनुमती नाकारल्यानंतरही संयोजकांनी मोर्चा होणारच, अशी भूमिका घेतल्याने तालुक्याच्या ठिकाणी जागोजागी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
१. सोलापूर शहराकडे येणार्या प्रत्येक मार्गावर पोलीस बंदोबस्त असल्याने आंदोलकांना आगेकूच करता आली नाही. शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौकातून हा मोर्चा पुढे छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे नेण्यात आला. सकाळी ११ वाजता होणारा मोर्चा पोलिसांच्या दडपशाहीमुळे दुपारी १ वाजता निघाला. या वेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मोर्चाच्या प्रारंभी आणि मोर्चाच्या समारोपप्रसंगी प्रमुख लोकप्रतिनिधींनी आंदोलकांना संबोधित केले.
२. या वेळी नरेंद्र पाटील म्हणाले, ‘‘आजच्या मोर्चात सहभागी झालेल्या एकही तरुणावर गुन्हा नोंद करू नका. गुन्हा नोंद करायचा असेल, तर माझ्यावर करा. ब्रिटीश काळात जसे पोलीस वागायचे तसेच आता पोलिसांनी केले. आजचा मोर्चा यशस्वी झाला. अपेक्षेपेक्षा अधिक संख्येने मराठा बांधव उपस्थित राहिले. यापुढचा मोर्चा प्रशासनाला न सांगता काढला जाईल.’’
मोर्चाच्या संदर्भातील घडामोडी
१. मोर्चा रोखण्यासाठी पोलिसांनी शहरात येणारी वाहने रोखण्यासाठी बॅरिकेट्स आणि बांबू लावून शहरात येणारे सर्व प्रवेशद्वारे बंद केली होती. सोलापूर शहर आणि ग्रामीण भागात मिळून ४ सहस्र पोलीस तैनात करण्यात आले होते.
२. अक्कलकोट येथून येणार्या आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यासह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते, तसेच मराठा समाज बांधव यांची वाहने पोलिसांनी रस्त्यातच अडवल्याने सर्वजण आक्रमक झाले होते, त्यामुळे त्यांनी जागेवरच ठिय्या आंदोलन केले.
३. मंगळवेढा (जिल्हा सोलापूर) येथून मोर्चासाठी सोलापूर येथे जात असलेल्या आमदार समाधान अवताडे यांच्यासमवेत आंदोलकांना पोलिसांनी कह्यात घेतले.