‘हिंदु धर्मात महिलांना दुय्यम स्थान दिले आहे’, असा कांगावा करणार्‍यांचा खोटेपणा !

‘पुरो(अधो)गामी आणि हिंदु धर्मावर टीका करणारी मंडळी ‘हिंदु धर्मात महिलांना दुय्यम स्थान दिले आहे, महिलांवर अनेक निर्बंध आहेत, महिला अबला आहेत’, अशा प्रकारची टीका करतात. अशा हिंदुद्वेष्ट्या मंडळींची टीका, म्हणजे केवळ तथ्यहीन आरोप असतात.

हिंदूंच्या पुराणांमध्ये दुर्गादेवीच्या विविध रूपांच्या अनेक कथा आहेत. या कथांमध्ये ‘देवीने असुरांचा कसा संहार केला आहे ?’, याचे वर्णन आहे. देवीच्या हातांमध्ये त्रिशूलादी अस्त्रे आहेत. काही देवींचे वाहन मृगराज सिंह आहे. अशा देवीची आराधना करायला ज्या धर्मात सांगितली आहे, त्या धर्मात महिलांना कधी दुय्यम स्थान असेल का ?

आता ‘या सगळ्या पुराणकथा, म्हणजे काल्पनिक गोष्टी आहेत’, असे म्हणून काही जण देवीचे माहात्म्य नाकारतील. वास्तविक वेद-पुराणे या गोष्टी मिथ्या नसून अंतिम सत्य आहेत; पण वादापुरते क्षणभर मान्य केले की, पुराणकथा, म्हणजे काल्पनिक गोष्टी आहेत, तरी त्यात सांगितलेल्या सुंदर कल्पनांपुढे मन आणि बुद्धी नतमस्तक होते. पुरो(अधो)गामी लोक त्यांची कल्पनाशक्ती पणाला लावून तरी देवीला, म्हणजे एका अर्थाने स्त्रीशक्तीला एवढे सामर्थ्यवान आणि वैभवशाली दाखवू शकतील का ? ‘सरड्याची धाव कुंपणापर्यंत’ या म्हणीप्रमाणे पुरो(अधो)गाम्यांची धाव महिलांना आधुनिक, विज्ञानवादी किंवा शारीरिकदृष्ट्या सक्षम दाखवेपर्यंतच होऊ शकते; पण एखादी स्त्री अस्त्रांच्या माध्यमातून असुरांचा संहार करत असल्याची किंवा मृगराज सिंहावर आरूढ झाल्याची कल्पनाही स्त्रीवादी किंवा पुरोगामी करू शकणार नाहीत. यावरूनच ‘हिंदु धर्मात महिलांना दुय्यम स्थान दिले आहे’, असा कांगावा करणार्‍यांचा खोटेपणा उघड होतो.’

– सौ. गौरी कुलकर्णी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२५.१०.२०२०)