मुंबई – राज्यातील ४२ साखर कारखाने विकत घेतल्याच्या प्रकरणात भ्रष्टाचार झाल्याची तक्रार ५ वर्षांपूर्वी दिली होती. इतका वेळ सक्तवसुली संचालनालय आणि आयकर विभाग झोपले होते का ? आता राजकीय सोयीसाठी कारवाई चालू आहे. पडद्यामागे काही हालचाली होऊन हे अन्वेषण थांबले, तर अन्वेषण करणार्यांच्या घरावर मोर्चा काढू, अशी चेतावणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी २ जुलै या दिवशी पत्रकार परिषदेत दिली.
या वेळी राजू शेट्टी म्हणाले, ‘‘उच्च न्यायालयात याचिकाही प्रविष्ट केली होती. तेथेही १-२ सुनावणीनंतर पुढे काहीच झाले नाही. कारखान्यांच्या विक्रीमुळे शेतकर्यांचे ८ सहस्र कोटी रुपये बुडाले. एकाही शेतकर्याचे भाग, ठेवी, कामगारांचे वेतन आणि वाहतुकीचे भाडे मिळाले नाही. जी आस्थापने यांमध्ये भागीदार आहेत, त्यांच्याकडे अचानक एवढा पैसा कुठून आला ? याचे अन्वेषण व्हायला हवे. कुणाला अद्दल घडावी, यासाठी आम्ही तक्रार केलेली नाही. शेतकर्यांचे कारखाने त्यांना परत मिळावेत, हीच आमची मागणी आहे. जोपर्यंत ही मागणी मान्य होत नाही, तोपर्यंत लढत रहाणार. काचेच्या घरात रहाणार्यांनी आता एकमेकांच्या घरांवर दगड मारण्यास प्रारंभ केला आहे. यातून अनेकांचा बुरखा टराटरा फाटणार आहे.’’