दुर्ग, छत्तीसगड येथील कु. शर्वरी कानस्कर (वय १४ वर्षे) हिने नृत्य सादर करण्याच्या प्रयोगामध्ये सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना जाणवलेली सूत्रे

संगीत सदर ईश्वरप्राप्तीसाठी संगीतयोग

१. कथ्थक नृत्य करतांना त्रितालामध्ये ‘कवित्त’ (टीप) हा प्रकार सादर करणे

अ. ‘कु. शर्वरी कानस्कर हिने नृत्य आरंभ करण्यापूर्वी मला तिच्यामध्ये आत्मविश्वास आणि शरणागतभाव जाणवत होता.

आ. शर्वरी ‘यमुनेवर पाणी भरायला गेलेली गोपी आणि तिचे मडके फोडून खोड्या काढणारा कृष्ण’ यावर आधारित नृत्य करू लागली.

इ. तिच्या हातांची अगदी लयबद्ध आणि हळुवार हालचाल होत होती. ती बघत रहावीशी वाटत होती. तिच्या हातांच्या हालचालीतून वायूतत्त्व प्रक्षेपित होत असल्याचे जाणवले. त्यामुळे तिच्या नृत्यातून आनंद जाणवत होता.

ई. नृत्याच्या आरंभी माझी चंद्रनाडी चालू होती. नृत्य चालू होऊन काही वेळ झाल्यावर माझी सुषुम्ना नाडी चालू झाली.

उ. या नृत्यातून प्रक्षेपित होणारी चांगली स्पंदने प्रथम माझे आज्ञाचक्र आणि मणिपुरचक्र यांवर जाणवू लागली. थोड्या वेळाने ती वरील सहस्रारचक्रापर्यंत आणि खालील मूलाधारचक्रापर्यंत अशी सर्वच चक्रांवर जाणवू लागली.

ऊ. या नृत्याला पूरक मुद्रा ‘मधल्या बोटाच्या टोकाला अंगठ्याचे टोक लावणे’, ही तेजतत्त्वाची मुद्रा आली. यामुळे माझी सुषुम्ना नाडी कार्यरत रहात होती.

ए. हे नृत्य पहातांना मला ‘जागृत ध्यानावस्था’ अनुभवता आली. त्या वेळी मला केवळ ते नृत्य दिसत होते. आजूबाजूच्या कशाचीही जाणीव मला नव्हती.

ऐ. ‘शर्वरी हिचे नृत्य भूमीपासून थोडे वर चालले आहे’, असे मला जाणवत होते.

ओ. नृत्याच्या आरंभी माझ्या नाडीचे ठोके ५६, तर नृत्य झाल्यावर नाडीचे ठोके ५४ झाले होते.

sadguru_mukul_gadgil_
सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ

२. ‘घूमर’ नृत्य सादर करणे

अ. हे नृत्य एका हिंदी चित्रपटातील होते.

आ. हे वेगवान नृत्य असल्याने राजसिक होते. या वेगवान नृत्यामध्येही शर्वरीच्या हातांच्या हालचाली लयबद्ध आणि हळुवार होत होत्या. त्यामुळे त्यांमध्ये रजोगुण जाणवत नव्हता.

इ. आरंभी या नृत्यातून शक्ती प्रक्षेपित होतांना जाणवली. पुढे पुनःपुन्हा केलेल्या त्या नृत्यातून थोडे चैतन्य प्रक्षेपित होतांना जाणवू लागले.

ई. या नृत्यामुळे माझ्या कोणत्याही कुंडलिनीचक्रावर चांगला परिणाम होत नव्हता.

उ. माझा श्रीकृष्णाचा नामजप आपोआप आरंभ झाला. हे नृत्य राजसिक असल्याने त्यातील रजोगुणाचा परिणाम न होण्यासाठी तसे झाले होते. मला मधेच एखादी जांभई येत होती. त्यामुळे मी हातांची मुद्रा शोधली असता ती ‘अंगठ्याच्या मुळाशी तर्जनीचे टोक लावणे’, ही आकाशतत्त्वाची मुद्रा आली.

ऊ. नृत्याच्या आरंभी माझी सूर्यनाडी चालू होती. नृत्याच्या शेवटी माझी सुषुम्ना नाडी चालू असल्याचे लक्षात आले.

ए. नृत्याच्या आरंभी माझ्या नाडीचे ठोके ६० होते. नृत्य झाल्यावर ते ५४ झाले होते. नृत्य राजसिक असूनही माझा नामजप आपोआप चालू झाल्याने, मी हातांची मुद्रा केली असल्याने आणि माझी सुषुम्ना नाडी चालू झाल्याने माझ्या नाडीचे ठोके अल्प झाले.’

– (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

कथ्थक नृत्यातील मुद्रा सादर करतांना कु. शर्वरी
टीप : कथ्थक नृत्यात एखादी कविता नृत्याच्या बोलांबरोबर मिसळून तालबद्ध स्वरूपात सादर केली जाते, तेव्हा त्याला ‘कवित्त (नृत्य)’ असे म्हणतात.