‘१९.५.२०२४ या दिवशी दैवी सत्संगात ‘आपण सर्व साधक गुरुदेवांचे उपनेत्र (चष्मा) आहोत’, असा भाववृद्धी होण्यासाठी प्रयोग घेतला. ६१ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. अपाला औंधकर (वय १७ वर्षे) आणि ६८ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. प्रार्थना पाठक (वय १३ वर्षे) यांनी घेतलेला हा प्रयोग आणि त्यातून त्यांना शिकायला मिळालेली सूत्रे येथे दिली आहेत.
१. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या खोलीतील पटलावर ठेवलेल्या एका बंद डबीत मनरूपी उपनेत्र बंदिस्त असणे आणि साधकांच्या मनरूपी उपनेत्राला गुरुदेवांच्या स्पर्शाची ओढ लागणे
‘आपण गुरुदेवांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) खोलीतील पटलावर ठेवलेल्या एका बंद डबीत एक उपनेत्र होऊन बंदिस्त झालो आहोत. या आपल्या मनरूपी उपनेत्राला वाटत आहे, ‘आपण इथे गुरुदेवांसाठी आलो आहोत. मग आपण गुरुदेवांचे कधी होणार ? या सर्वसाधारण उपनेत्राला गुरुदेवांचा स्पर्श होऊन आपण पवित्र कधी होणार ?’
२. उपनेत्रावर असलेल्या स्वभावदोष आणि अहं या डागांमुळे ते हतबल होणे आणि ‘या स्वभावदोषांतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्नांचे बळ द्या’, अशी प.पू. गुरुदेवांना शरण जाऊन प्रार्थना करणे
त्याच वेळी या उपनेत्रावर असलेल्या डागांकडे आपले लक्ष जात आहे. हे डाग म्हणजे आपले जन्मोजन्मीचे संस्कार, स्वभावदोष, अहं आणि अनावश्यक विचार आहेत. या डागांकडे पहाताच आपल्याला खंत वाटत आहे.‘डाग असलेले उपनेत्र गुरुदेवांना कसे आवडणार ?’, या विचाराने आपली तळमळ अजूनच वाढली आहे. आपण गुरुदेवांना कळकळीने प्रार्थना करत आहोत. ‘हे गुरुमाऊली, आम्ही तुमच्या चरणी शरण आलो आहोत. आम्ही आमचे स्वभावदोष आणि अहं यांमुळे हतबल झालो आहोत. तुम्हीच या आणि आम्हाला यांतून बाहेर काढा. स्वभावदोष आणि अहं निर्मूलन यांसाठी तुम्हीच आम्हाला बळ देणार आहात. गुरुदेवा, आम्ही तुम्हाला शरण आलो आहोत. शरण आलो आहोत देवा !’
३. या बंद डबीत अकस्मात् प्रकाशाची बारीक फट दिसणे, साक्षात् भक्तवत्सल गुरुदेवच आपल्या हाकेला धावून येणे आणि उपनेत्राला महाविष्णूच्या करकमलांचा स्पर्श होणे अन् भावाश्रूंनी भिजलेल्या या उपनेत्राकडे प.पू. गुरुदेवांनी कृपामय दृष्टीने पहाणे
आमची उत्कंठा आता शिगेला पोचली आहे. याच व्याकुळ भावात असतांना अकस्मात् त्या बंद डबीत प्रकाशाचा एक बारीक किरण दिसू लागला. हळूहळू ती पूर्ण डबी उघडली गेली. कोण बरे उघडत आहे डबी ? ‘साक्षात् भक्तवत्सल गुरुदेवच आपल्या हाकेला धावून आले आहेत. गुरुदेवांचे दर्शन होताच आपल्याला भावाश्रू अनावर झाले आहेत. साक्षात् महाविष्णूच्या करकमलांचा स्पर्श आपल्याला होत आहे. त्या भावाश्रूंनी आता हे उपनेत्र चिंब भिजले आहे. भावसागरात भिजलेल्या या उपनेत्रांकडे गुरुदेव कृपामय दृष्टीने पहात आहेत. त्यांचे ते रूप आपल्या अंतःकरणात साठवून ठेवूया.
४. प.पू. गुरुदेवांनी उपनेत्र पुसतांना त्यांच्या करुणामयी प्रीतीनेच साधकांच्या मनातील सर्व अनावश्यक विचार पुसून टाकणे, ते उपनेत्र कमलनयनांवर लावणे अन् हे उपनेत्र गुरुदेवांची प्रीती साधकांपर्यत पोचवणारा सेवकच होणे
आता प.पू. गुरुदेव एका मऊ कापडाने ते उपनेत्र हळूवार पुसत आहेत. जणूकाही त्यांच्या करुणामयी प्रीतीनेच ते आपल्या मनातील सर्व अनावश्यक विचार आणि जन्मोजन्मीचे संस्कार पुसून टाकत आहेत. प.पू. गुरुदेव ‘त्यांची अमृताप्रमाणे प्रीतीसुद्धा आपल्यावर करत आहेत’, असेच आपल्याला जाणवत आहे. त्यानंतर गुरुदेवांनी ते उपनेत्र त्यांच्या प्रीतीने ओथंबलेल्या कमलनयनांवर लावले. त्यांनी उपनेत्र लावता क्षणी मनरूपी उपनेत्रही प्रीतीमय झाले आहे; कारण गुरुदेवांची प्रत्येक साधकाकडे पहाण्याची दृष्टीच प्रीतीमय आहे आणि या उपनेत्रावर ती सर्वप्रथम पडत आहे. जणूकाही हे उपनेत्र गुरुदेवांची प्रीती साधकांपर्यत पोचवणारा सेवकच झाला आहे.
५. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे ‘उपनेत्राच्या काचेप्रमाणे सत्संगातील साधकांना स्वतःही पारदर्शक झालो आहोत’, असे अनुभवता येणे
आपले मन आता अत्यंत निर्मळ आणि उपनेत्राच्या काचेप्रमाणे पारदर्शक झाल्याचे आपण अनुभवत आहोत. प.पू. गुरुदेवच त्या निर्जीव उपनेत्राला दृष्टी देऊन त्याला सजीवता देत आहेत. करुणामय गुरुदेवांच्या कमलनयनांमध्ये सामावलेला प्रीतीचा महासागर आपण सर्वांनी अखंड अनुभवूया.
‘हे गुरुदेवा, ‘आज तुम्ही आम्हाला तुमचे दिव्य उपनेत्र होण्याची संधी देऊन तुमची प्रत्येकावर असलेली प्रीती अनुभवायला दिलीत. ही भावस्थिती आम्हाला अखंड अनुभवता येऊ दे.’
६. भाववृद्धी प्रयोगातून शिकायला मिळालेली सूत्रे
६ अ. उपनेत्र डागांनी भरलेले असेल, तर साधकांकडे पहातांना प्रेमभावाने पहाता न येणे आणि स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करून मन निर्मळ झाल्यावरच प.पू. गुरुदेवांच्या प्रीतीचे माध्यम बनता येणे : भाववृद्धी प्रयोगातील उपनेत्र, म्हणजे आपले अंतर्मन आहे. आपल्या अंतर्मनात स्वभावदोष आणि अहं, तसेच अनावश्यक विचार असतील, तर त्यांचे प्रतिबिंब आपल्या वागण्यात दिसून येते. त्याचप्रमाणे हे उपनेत्र जर अशा डागांनी भरलेले असेल, तर आपल्याला सर्व साधकांकडे प्रेमभावाने पहाता न येता आपल्याला त्यांचे स्वभावदोषच दिसतील. मग असे उपनेत्र गुरुदेव त्यांच्या कमलनयनांवर कसे लावतील ? हे उपनेत्र प.पू. गुरुदेवांची प्रीती सर्व साधकांना देण्याची सेवा कशी करणार ? त्यामुळे आधी स्वभावदोष आणि अहं निर्मूलन करून आपले मन निर्मळ करूया. आपले मन निर्मळ केले, तर आपल्याला गुरुदेवांच्या प्रीतीचे माध्यम बनता येणार आहे.
६ आ. गुरूंच्या उपनेत्राप्रमाणे प.पू. गुरुदेवांची प्रीती सर्व साधकांपर्यंत पोचवणारे प्रीतीचे माध्यम बनण्यासाठी प्रेमभाव वाढवण्यासाठी प्रयत्न करूया ! : काही वेळा पूर्वग्रहामुळे आपल्याला साधकांशी प्रेमाने वागता येत नाही. तेव्हा ‘आपण गुरूंच्या उपनेत्राप्रमाणे गुरुदेवांची प्रीती सर्व साधकांपर्यंत पोचवणारे प्रीतीचे माध्यम आहोत’, हे लक्षात घेऊन प्रयत्न करूया. जर आपण साक्षात् प्रीतीस्वरूप सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या (गुरुदेवांच्या) प्रीतीचे माध्यम आहोत, तर आपण किती प्रेमभाव वाढवायला हवा ? त्यासाठी आपण प्रयत्न करूया.
६ इ. भाववृद्धी प्रयोगात ज्या वेळी मनरूपी उपनेत्राला आपले स्वभावदोष आणि अहं यांची जाणीव झाली, त्या वेळी त्याने जशी कळकळीने प.पू. गुरुदेवांना साद घातली, त्याचप्रमाणे आपणही आपल्यातील शरणागतभाव वाढवूया !
७. कृतज्ञता
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, ‘तुमच्याच अनंत कृपेमुळे आम्हाला या दैवी सत्संगाच्या सेवेच्या माध्यमातून तुमचे अस्तित्व अनुभवायला देत आहात. यासाठी आम्ही कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे.’ ‘हे परमेश्वरस्वरूप गुरुदेवा, ‘तुमच्या दिव्य उपनेत्राप्रमाणे आम्हालाही अखंड तुमची प्रीतीसरिता अनुभवता येऊ देत. या सत्संगाप्रती आम्ही तुमच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहोत.’
– कु. प्रार्थना पाठक (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के, वय १३ वर्षे), पुणे आणि कु. अपाला औंधकर(आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय १७ वर्षे), फोंडा, गोवा. (११.७.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |