परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीतील भिंतींवर उमटणार्‍या डागांच्या गुणवैशिष्ट्यांमागील अध्यात्मशास्त्र !

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीतील भिंतींवर विविध प्रकारचे डाग उमटतात. त्या डागांची काही वैशिष्ट्ये आहेत. या वैशिष्ट्यांमागील आध्यात्मिक कार्यकारणभाव पुढीलप्रमाणे आहे.

कु. मधुरा भोसले

१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीतील भिंतींवर उमटणारे काही डाग काही कालावधीनंतर गडद किंवा स्पष्ट दिसण्यामागील सूक्ष्म प्रक्रिया आणि ते डाग निर्माण करणार्‍या वाईट शक्तींचे वैशिष्ट्य

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीतील भिंतींवर उमटणारे काही डाग काही कालावधीनंतर गडद किंवा स्पष्ट होतात. त्या वेळी होणारी सूक्ष्म प्रक्रिया आणि ते डाग निर्माण करणार्‍या मोठ्या वाईट शक्तींचा स्तर यांविषयीची माहिती पुढीलप्रमाणे आहे.

‘जितके रूप विद्रूप असेल, तितकी त्रासदायक स्पंदने अधिक प्रमाणात वातावरणात प्रक्षेपित होतात.’ या नियमानुसार परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीत त्रासदायक स्पंदने प्रक्षेपित करून त्यांना शारीरिक आणि आध्यात्मिक स्तरांवर त्रास देण्यासाठी ५ व्या आणि ६ व्या पाताळांमधील विविध प्रकारच्या वाईट शक्ती त्यांच्या खोलीतील लादी, भिंती आणि खिडक्यांच्या काचा यांवर विविध प्रकारचे डाग पाडून त्रास देण्यासाठी प्रयत्नरत असतात. केवळ त्रासदायक शक्ती प्रक्षेपित केली, तर आश्रमातील चैतन्यदायी वातावरणामुळे ती लवकर नष्ट होते. याउलट भिंतींवर डाग पाडले, तर त्यांमध्ये त्रासदायक शक्ती दीर्घकाळ टिकून रहाते आणि ती आवश्यकतेनुसार डागांतून खोलीतील वातावरणात प्रक्षेपित होते. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा त्यांच्या रहात्या खोलीमध्ये अधिक प्रमाणात वावर असल्यामुळे त्यांच्या खोलीतील भिंतींवरील डागांतील त्रासदायक शक्तीचा परिणाम त्यांच्यावर अधिक प्रमाणात होतो. ‘त्यामुळे डोके जड होणे, काहीही न सुचणे, प्राणशक्ती खेचली जाणे’, यांसारखे त्रास होतात. त्यामुळे पाताळ क्रमांक ५ आणि ६ येथील मायावी मोठ्या वाईट शक्ती तंत्रविद्येद्वारे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीवर सूक्ष्म स्तरावर आक्रमण करून त्यांच्या रहात्या खोलीतील भिंतीवर विविध प्रकारचे डाग पाडतात. जेव्हा डागांमध्ये साठलेली त्रासदायक शक्ती अप्रकट अवस्थेत असते, तेव्हा ते डाग फिकट, पुसट किंवा अस्पष्ट दिसतात. जेव्हा डागांमध्ये साठलेली त्रासदायक शक्ती प्रकट स्वरूपात कार्यरत असते, तेव्हा ते डाग गडद किंवा स्पष्ट दिसतात.

२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीतील भिंतींवर उमटणारे काही डाग काही कालावधीनंतर अस्पष्ट किंवा नष्ट होण्यामागील सूक्ष्म प्रक्रिया आणि ते डाग निर्माण करणार्‍या वाईट शक्तींचे वैशिष्ट्य

पाताळ क्रमांक ५ आणि ६ मधील मायावी शक्ती परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीतील भिंतींवर विविध प्रकारचे डाग निर्माण करतात. जेव्हा आश्रमातील चैतन्य आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीतील भिंतींवर पडलेल्या डागांतील त्रासदायक शक्ती यांच्यामध्ये सूक्ष्म युद्ध होते, तेव्हा डागांमध्ये साठलेल्या त्रासदायक शक्तीचे प्रमाण न्यून होते. त्याचप्रमाणे काही डागांमधील त्रासदायक शक्ती वायुतत्त्वाच्या म्हणजे निर्गुण स्तरावर कार्यरत होते. तेव्हा त्यांच्यातील तेजतत्त्वमय सगुण स्तरावरील शक्ती न्यून होऊन त्यांचे सगुणदर्शक रूप अस्पष्ट होते. त्यामुळे भिंतींवर पडलेले डाग काही कालावधीनंतर अस्पष्ट किंवा नष्ट होतात.

३. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीतील भिंतींवरील तोंडवळे काही कालावधीनंतर पालटणे आणि त्या ठिकाणी नवीन तोंडवळे उमटण्यामागील सूक्ष्म प्रक्रिया अन् ते डाग निर्माण करण्यासाठी वाईट शक्तींना लागणारा कालावधी

पाताळ क्रमांक ५ आणि ६ मधील अघोरी विद्या प्राप्त असलेल्या वाईट शक्ती परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीतील भिंतींवर डाग पाडून त्यांमध्ये सूक्ष्म यंत्रे बसवतात. डागांमध्ये सगुण स्तरावरील आपतत्त्वात्मक आणि तेजतत्त्वात्मक त्रासदायक शक्ती अधिक प्रमाणात कार्यरत असल्यामुळे त्यांत विविध आकृत्या किंवा तोंडवळे उमटतात. जेव्हा आश्रमातील चैतन्यामुळे भिंतींवर डागांतील एखाद्या तोंडवळ्यातील सगुण स्तरावरील त्रासदायक शक्ती नष्ट होते, तेव्हा सगुण स्तरावर सूक्ष्म युद्ध करण्यासाठी या डागांत लपवलेली त्रासदायक यंत्रे कार्यरत होतात. जेव्हा या यंत्रांतून प्रक्षेपित झालेली आप आणि तेज या तत्त्वमय सगुण स्तरावरील त्रासदायक शक्ती पुन्हा कार्यरत होते, तेव्हा त्या डागांच्या ठिकाणी नवीन तोंडावळा उमटलेला दिसतो. डागांमध्ये उमटलेले तोंडवळे पालटण्यासाठी वाईट शक्तींना साधारण वर्षभराचा कालावधी लागतो. सूक्ष्म युद्ध पंचतत्त्वांपैकी कोणत्या स्तरावर चालू आहे, त्यानुसार युद्धनीती ठरते आणि वाईट शक्तींच्या लढण्याचे स्वरूप पालटते. याचा दृश्य परिणाम परात्पर गुरु डॉ. आठवले यांची खोली किंवा सनातनचे आश्रम यांच्या भिंतींवर किंवा लाद्यांवर पडलेल्या डागांमधील पालटांवरून लक्षात येते.

४. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीतील भिंतींवर उमटलेल्या आकृत्या किंवा तोंडवळे काही कालावधीनंतर पुसल्याप्रमाणे दिसणे; परंतु डाग तसेच रहाणे यामागील आध्यात्मिक कार्यकारणभाव

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीमध्ये पाताळातील मोठ्या वाईट शक्तींनी उमटवलेल्या डागांतून सतत त्रासदायक शक्तीचे प्रक्षेपण होत असते. जेव्हा आश्रमातील चैतन्यामुळे या डागांमधील त्रासदायक शक्तीचे प्रमाण न्यून होते, तेव्हा भिंतीवर पडलेले डाग पुसट किंवा अस्पष्ट होतात. काही वेळा वाईट शक्ती युद्धनीतीनुसार छुपी आक्रमणे करतात, तेव्हा डागांमधील शक्ती नष्ट झाल्याचे भासवण्यासाठी ते डाग पुसले जातात. त्यामुळे त्या डागांकडे आपले लक्ष जात नाही; परंतु त्या डागांच्या माध्यमातून वाईट शक्ती निर्गुण स्तरावरील त्रासदायक शक्ती प्रक्षेपित करून त्रास देत रहातात. त्यामुळे पुसल्यासारखे दिसणारे डाग संपूर्णपणे नष्ट न होता तसेच रहातात.

५. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीतील भिंतींवर उमटलेले काही डाग काळ्या रंगाचे, तर काही डाग पांढर्‍या रंगाचे असण्यामागील आध्यात्मिक कार्यकारणभाव

पाताळातील मोठ्या वाईट शक्ती परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर सूक्ष्मातून आक्रमणे करण्यासाठी त्यांच्या खोलीतील भिंतींवर विविध प्रकारचे डाग पाडतात. जेव्हा डागांमधून प्रकट स्वरूपातील त्रासदायक आणि आक्रमक वाईट शक्ती प्रक्षेपित करायची असते, तेव्हा डागांचा रंग काळा असतो. काळ्या रंगामध्ये त्रासदायक शक्ती सर्वाधिक प्रमाणात कार्यरत असल्याने वाईट शक्ती काळ्या डागांच्या माध्यमातून लढते. जेव्हा पाताळातील वाईट शक्तींना मायावी शक्तीच्या साहाय्याने सूक्ष्म युद्ध करायचे असते, तेव्हा त्या पांढर्‍या रंगाच्या डागांच्या माध्यमातून प्रयत्नरत होतात. त्यामुळे भिंतींवर पांढरे डाग पडतात.

६. आध्यात्मिक स्तरावरील उपाय

अ. विभूती किंवा कापूर मिश्रित पाण्याने डाग पुसणे

आ. डागांवर विविध देवतांच्या नामपट्ट्या लावणे

इ. लादीवर डाग पडले असल्यास त्यावर रिकामे खोके उपडे करून ठेवणे

– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२२.४.२०२१)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.