राज्यातील सलून (केस कापण्याचे दुकान) आणि न्हाव्यांची दुकाने उघडण्याविषयी सलून मालक गटाकडून मुख्यमंत्र्यांना निवेदन

पणजी – राज्यातील सलून (केस कापण्याचे दुकान) आणि न्हाव्यांची दुकाने उघडण्यास अनुमती देण्यात यावी, अशी मागणी करणारे एक निवेदन सलून मालक गटाने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि जिल्हाधिकारी यांना दिले आहे. केस आणि सौंदर्य सेवा यांची तुलना ‘मसाज पार्लर’शी करू नये. केस आणि सौंदर्य सेवा ही आवश्यक सेवा ठरली असून ती प्रत्येकाची आवश्यकता आहे, असे या गटाने म्हटले आहे.

कोरोना महामारीच्या दुसर्‍या लाटेमुळे २९ एप्रिल २०२१ पासून गोव्यात संचारबंदी लागू करतांना व्यावसायिकांवर कठोर निर्बंध लादण्यात आले आहेत; मात्र हळूहळू त्यामध्ये शिथिलता आणून बहुतेक व्यापारी आस्थापने चालू करण्यास अनुमती देण्यात आली आहे. राज्यातील स्पा, मसाज पार्लर आणि जिम यांसह सलून अन् न्हाव्यांची दुकाने अजूनही बंदच आहेत.

केस आणि सौंदर्य सेवा आवश्यक सेवेमध्ये समाविष्ट करण्यात यावी. शासकीय निर्बंधांचे काटेकोरपणे पालन करून सलून सेवा सुरक्षित वातावरणात चालू ठेवण्यास अनुमती देण्यात यावी, अशी मागणी या गटाने केली आहे.