मुंबई – आरक्षणामुळे हिंदु धर्मात फूट पडली आहे. गुणवत्तेकडे दुर्लक्ष झाले आणि प्रचंड जातीवाद निर्माण झाला. त्यामुळे ‘आरक्षणमुक्त भारत’ हीच शाहू महाराज यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे वक्तव्य करणी सेनेचे महाराष्ट्र प्रमुख श्री. अजयसिंह सेंगर यांनी केले. पनवेल (जिल्हा रायगड) येथील राणा सभागृहात नथुराम सेनेच्या वतीने छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात उपस्थितांना मार्गदर्शन करतांना श्री. अजयसिंह सेंगर यांनी वरील मत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश वायंगणकर, तर आभारप्रदर्शन सुमित चौगुले यांनी केले.
या वेळी श्री. अजयसिंह सेंगर म्हणाले, ‘‘ज्या उद्देशाने छत्रपती शाहू महाराज यांनी आरक्षण चालू केले होते, तो उद्देश अद्यापही यशस्वी झालेला नाही. देशात आरक्षणाने सामाजिक अस्थिरता आणि प्रचंड विषमता निर्माण झाली. सत्ताधारी पक्षाचे विकासाकडे दुर्लक्ष झाले. परिणामी देशाचा विकास मंदावला. प्रत्येक राजकीय पक्ष विकासापेक्षा जातीकडे बघून निर्णय घेत आहे. विकासाकडे दुर्लक्ष झाल्याने देशात बेकारी, गरिबी वाढत आहे.’’