पुढील आदेश लागू होईपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यात ४ थ्या स्तरातील निर्बंध !

चेंबर ऑफ कॉमर्स’च्या बैठकीत प्रशासनाच्या निर्णयास विरोध करतांना व्यापारी आणि चेंबरचे पदाधिकारी

कोल्हापूर, २७ जून – कोरोनाच्या संदर्भात जिल्ह्यात यापूर्वी लागू करण्यात आलेले ४ थ्या स्तरातील निर्बंध पुढील आदेश लागू होईपर्यंत तसेच रहाणार आहेत, असे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापक प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे यांनी निर्गमित केले आहेत.

लसीकरणाविषयी सार्वजनिक जनजागृती करणे, लसीकरणास पात्र लोकसंख्येच्या अधिकाधिक ७० टक्के पर्यंत लसीकरण लवकरात लवकर पूर्ण करणे. कामाच्या ठिकाणी उपस्थित कामगारांचे लसीकरण करणे आणि त्यांना लसीकरण करण्याविषयी प्रोत्साहित करणे, अशा उपाययोजना करण्यात याव्यात, असेही त्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

प्रशासनाच्या निर्णयास ‘चेंबर ऑफ कॉमर्स’चा विरोध

प्रशासनाच्या या निर्णयास ‘चेंबर ऑफ कॉमर्स’ने विरोध केला आहे. या निर्णयाच्या विरोधात व्यापारी आक्रमक झाले असून सोमवार, २८ जूनपासून जिल्ह्यातील दुकाने सरसकट उघडण्याचा निर्णय चेंबरच्या बैठकीत घेण्यात आला.