संरक्षण कर्मचारी संघटनांची संपाची चेतावणी !

देशातील सर्व ‘ऑर्डनन्स फॅक्टरीं’चे ७ आस्थापनात रूपांतर करण्याच्या निर्णयाचे प्रकरण

पुणे – देशभरातील सर्व ‘ऑर्डनन्स फॅक्टरीं’चे ७ आस्थापनांमध्ये रूपांतर करण्याच्या निर्णयाविरोधात संरक्षण कर्मचारी संघटनांनी संपाची चेतावणी दिली आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाच्या निषेधार्थ १ जुलै या दिवशी संपाची नोटीस देणार असून १९ जुलैपासून अनिश्चित कालावधीसाठी संपावर जाण्याचा निर्णय या संघटनांनी घेतला आहे. ऑल इंडिया डिफेन्स एम्पलॉइज फेडरेशन (‘ए.आय.डी.ई.एफ्.’) इंडियन नॅशनल डिफेन्स वर्कर्स फेडरेशन (‘आय.एन्.डी.डब्ल्यू.एफ्.’) आणि भारतीय प्रतिरक्षा मजदूर संघ (‘बी.पी.एम्.एस्.’) या संरक्षण कर्मचार्‍यांच्या प्रमुख संघटनांच्या प्रतिनिधींची २० जून या दिवशी ऑनलाईन बैठक झाली.

‘ऑर्डनन्स फॅक्टरी’ ७ कॉर्पोरेट आस्थापनांमध्ये विभागण्याचा केंद्र सरकारचा निर्णय देशहिताचा नाही. संरक्षण कर्मचार्‍यांच्या नोकर्‍यांवर आणि देशाच्या सुरक्षिततेवर याचा परिणाम होईल. त्यामुळे संपावर जाण्याचा निर्णय घेतल्याचे भारतीय प्रतिरक्षा मजदूर संघाचे संजय मेनकुदळे यांनी सांगितले.