नाशिक – छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराज यांची भूमिका एकत्र कशी आणता येईल, हा माझा दृष्टीकोन आहे, असे खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी सांगितले. मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने येथे संभाजीराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन येथे पार पडले. त्या वेळी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, आपल्याला समाजासाठी काहीतरी करायचे आहे. मी फक्त मराठ्यांचे नेतृत्व करत नाही. मी मराठा समाजाच्या माध्यमातून एक निमित्त आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठीच्या पर्यायांवर लक्ष्य केंद्रीत करायचे आहे. ‘रिव्ह्यूव पिटीशन’ हा पहिला पर्याय आहे, तर दुसरा मार्ग म्हणजे ३३८ ब च्या माध्यमातून मागासवर्गीय आयोग सिद्ध करावा लागेल. आयोगाच्या माध्यमातून राज्यपाल, मग केंद्रीय मागासवर्ग आयोग, राज्य मागासवर्ग आयोग, राष्ट्रपती, पंतप्रधान आणि मग संसदेत असे जावे लागेल. राज्य सरकारच्या हातात असलेल्या आमच्या मागण्यांची पूर्तता राज्य सरकारने करावी.
‘मराठा समाजाला हक्काचे आरक्षण मिळाले पाहिजे, याविषयी कुणाचेही दुमत नाही’, असे प्रतिपादन राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री, तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.