नागपूर – ‘सरकारी व्यवस्थेतील सचिवांची स्थिती मंदिरातील नंदीप्रमाणे आहे. मंदिरातील नंदीला जितके महत्त्व असते, तितकेच यंत्रणेतील सचिव महत्त्वपूर्ण झालेले आहेत. हेच लोक सरकार चालवतात’, अशी टीका केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नोकरशाहीवर केली. केंद्रीय राखीव पोलीस दलातील (सी.आर्.पी.एफ्) प्रशिक्षणार्थी सैनिकांशी संवाद साधतांना ते बोलत होते. (आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी सचिवांच्या कारभारावर चोखपणे लक्ष न ठेवल्याने ते मनमानी पद्धतीने वागत आहेत; मात्र शासनकर्त्यांकडूनच त्यांना पाठीशी घातले जाते. असे करण्यापेक्षा त्यांच्यावर कठोर कारवाई करणे अधिक महत्त्वाचे आहे ! – संपादक)
१. या वेळी ‘सी.आर्.पी.एफ्’च्या वाहनांना पथकर नाक्यावर पैसे न भरण्याची सवलत देण्यात यावी’, अशी विनंती आयोजकांद्वारे गडकरी यांच्याकडे करण्यात आली.
२. या सूत्रावरून गडकरी प्रशासकीय यंत्रणेवर ताशेरे ओढतांना म्हणाले की, लष्कर आणि पोलीस यांच्या वाहनांना पथकर नाक्यातून सवलत असतांना ‘सी.आर्.पी.एफ्’च्या वाहनांना का नाही ? याविषयी त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. (केवळ आश्चर्य व्यक्त करण्यापेक्षा देशात आतापर्यंत कोणकोणत्या शासकीय वाहनांना पथकरात सवलत देण्यात आलेली नाही, हे पहायला हवे आणि संबंधित दोषी अधिकार्यांवर कठोर कारवाई करायला हवी. आतापर्यंत नियमाप्रमाणे सवलत न देता पथकर आकारण्यात आलेल्या ‘सी.आर्.पी.एफ्’च्या वाहनांचा पथकर व्याजासह त्यांना परत करण्याचा आदेश पथकर नाक्यांच्या मालकांना द्यायला हवा. – संपादक)