एम्.आय.डी.सी.कडून भूमी हस्तांतरित
दोडामार्ग – येथील आडाळी औद्योगिक क्षेत्रातील ५० एकरचा भूखंड महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एम्.आय.डी.सी.ने) राष्ट्रीय वनौषधी संशोधन प्रकल्पासाठी दिला आहे. गेल्या ३ वर्षांपासून राष्ट्रीय वनौषधी संशोधन संस्था येथील औद्योगिक क्षेत्रात भूखंड मिळावा, यासाठी प्रयत्नरत होती.
आडाळी येथे एम्.आय.डी.सी. क्षेत्रास मान्यता मिळून ८ वर्षे झाली. केंद्र आणि राज्य सरकार यांच्या संयुक्त सहकार्यातून हा वनौषधी संशोधन प्रकल्प येथे होणार आहे. यासाठी गेल्या ३ वर्षांपासून प्रयत्न चालू होते. आडाळी येथे संमत झालेला हा प्रकल्प यापूर्वी जळगाव येथे नेण्याचा प्रयत्न झाला होता; मात्र स्थानिक लोकप्रतिनिधींच्या प्रयत्नांनी तो आडाळी येथे कायम राहिला. केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी आडाळी येथे हा प्रकल्प संमत केल्याची घोषणा केली होती.
१८ जूनला दोडामार्ग तहसीलदार अरुण खानोलकर आणि एम्.आय.डी.सी.चे अधिकारी उमेश कोष्टी यांनी आडाळी येथे भूखंड हस्तांतरण करारावर सह्या केल्या. या वेळी मंडल अधिकारी प्रेमानंद सावंत, तलाठी उपस्थित होते.