सध्या विदेशात संस्कृत श्लोक किंवा शब्द अंगावर गोंदवून घेण्याचा नवा प्रकार चालू झाला आहे. अनेक जणांमध्ये ‘अनुगच्छतु प्रवाह’ (प्रवाहासमवेत जाणे) हा शब्द अंगावर ‘टॅटू’ म्हणून गोंदवून घेण्याची चढाओढ लागल्याचे पहायला मिळत आहे. विदेशी नागरिकांना प्राचीन भारतीय भाषा अर्थात् संस्कृतविषयी असलेल्या कुतूहलाचे हे एक उदाहरण आहे. दुसरीकडे भारतात मात्र संस्कृत भाषेला मृत भाषा म्हणून तिची उपेक्षा होत आहे. सध्या अनेक विदेशी नागरिक भारतीय संस्कृतीकडे जिज्ञासेने पहात असून तिचे आचरणही करत आहेत. मानसिक समाधान मिळण्यासाठी युरोप खंडातील नागरिक योगसाधना शिकत असून त्याकरता भारतातील संतांना ते आदराने निमंत्रित करू लागले आहेत. ‘हॉलीवूड’चे अभिनेते सिल्वेस्टर स्टॅलोन यांनी कुटुंबियांसमवेत हरिद्वार येथे मुलाचे पिंडदान केले. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हनुमानाची लहान मूर्ती कायम खिशात ठेवतात. ते म्हणतात की, मी जेव्हा निराश असतो किंवा थकतो, तेव्हा या मूर्तीकडे बघितल्यावर मला काम करण्याची ऊर्जा मिळते. ब्राझिलच्या जोनास मसेटी यांनी भारतात ४ वर्षांचा कालावधी घालवल्यानंतर ते तंत्रज्ञानाच्या माध्यमातून वेदांचे महत्त्व जगापर्यंत पोचवण्याचे काम करत आहेत. मसेटी ब्राझिलमध्ये श्रीमद्भगवद्गीता आणि वेद यांचे शिक्षण देतात. जोनास यांनी गेल्या ७ वर्षांमध्ये ‘ऑनलाईन कोर्स’द्वारे लाखो जणांना वेदांचे शिक्षण दिले आहे.
भारतीय संस्कृती मुळातच प्रगत असल्याने आज आधुनिक विज्ञानातून जे शोध लावले जातात, ते बहुतांशी भारतीय संस्कृतीत पूर्वीच सांगितलेले आढळतात. भारतीय संस्कृतीचे हे महत्त्व विदेशी नागरिकांना उमजत आहे. यासह भारतीय संस्कृती शिकणे आणि तिचा प्रचार करणे यांसाठी ते कृतीशील होत आहेत, ही हिंदुद्वेष्ट्यांना आणि तथाकथित पुरो(अधो)गाम्यांना चपराकच आहे. ‘विदेशी नागरिक जे करतात, त्याचे अनुकरण करायचे’, असा जणू पायंडाच सध्या भारतात पडला आहे. पाश्चात्त्यांचे ते चांगले आणि पुढारलेले अथवा ‘फॅशन’ या मानसिकतेमुळे अनेक भारतीय विदेशींना अनुसरतात. त्यामुळे पाश्चात्त्यांचे अनुकरण म्हणून का होईना, हिंदू महान हिंदु संस्कृतीचे महत्त्व लक्षात घेतील, तो सुदिन म्हणायचा !
– सौ. अपर्णा जगताप, पुणे