योग हे मनुष्याच्या आंतरिक शक्तीच्या संपूर्ण विकासाचे एक सर्वश्रेष्ठ शास्त्र ! – स्वातंत्र्यवीर सावरकर

२१ जून २०२१ या दिवशी असलेल्या ‘आंतरराष्ट्रीय योगदिना’च्या निमित्ताने…

​अत्यंत खडतर परिस्थिती आणि प्रतिकूल वातावरणात ८ दशकांपेक्षा अधिक जीवनाचा प्रवास स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी योगशास्त्राच्या बळावर यशस्वी केला. योगवसिष्ठांचा सावरकर यांना व्यासंग होता आणि अष्टांगयोगही त्यांनी डोळसपणे अभ्यासला होता. त्यांना योगशास्त्राची गोडी तरुण वयातच लागली होती. सावरकर यांच्या ‘सप्तर्षी’ आणि ‘माझी जन्मठेप’ या ग्रंथात योगशास्त्राचे उल्लेख आढळतात. ‘योग हे मनुष्याच्या आंतरिक शक्तीच्या संपूर्ण विकासाचे एक सर्वश्रेष्ठ शास्त्र आहे’, असे स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी म्हटले आहे.

आज २१ जून ‘आंतरराष्ट्रीय योगदिन’ असून त्या निमित्ताने शतपैलू सावरकर यांचे योगविषयक विचारही समाजाला प्रेरणादायी आहेत.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी शालेय जीवनापासूनच योगाला दिलेले महत्त्व

‘अगदी शालेय जीवनातच स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी व्यायामाला महत्त्व दिले होते. जोर-बैठका, सूर्यनमस्कार, पोहणे इत्यादी व्यायाम ते करत असत. भगूरच्या (जिल्हा नाशिक) घरात वडिलांकडून धार्मिक ग्रंथांची ओळख सावरकर यांना झाली. लहानपणी त्यांनी ‘भगवद्गीता’ आणि लोकमान्य टिळक यांचे ‘गीतारहस्य’ वाचले. नंतर त्यांनी योगसूत्रे पाठ केली आणि महाविद्यालयीन काळात स्वामी विवेकानंद यांनी लिहिलेला ‘राजयोग’ हा त्यांनी वाचला होता. ‘योगातून निष्काम कर्म’, हा संदेश सावरकर यांनी घेतला. ‘फळाची अपेक्षा न करता कर्म करत रहाणे, हेच खरे जीवन आहे’, हे त्यांनी सिद्ध केले होते.

​नाशिकमधून पुणे येथे फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये सावरकर यांचा प्रवेश झाला, तेव्हा ते महाविद्यालयीन मित्रांना समवेत घेऊन त्यांना योग आणि व्यायाम यांचे महत्त्व पटवून सांगत असत. महाविद्यालयीन काळात व्यायामाचे साहित्यही त्यांनी खरेदी केले होते. सावरकर यांचा योगशास्त्राचा अभ्यास दांडगा होता. मुंबईमधील कारागृहात असतांना सकाळी सावरकर योग आणि व्यायाम करत, तेव्हा आजूबाजूच्या चाळीतील लोक त्यांना पहात असत.

सर्वश्रेष्ठ आनंद प्राप्त करून घेणे, हे मनुष्याचे सर्वश्रेष्ठ ध्येय !

​जीवनात योगाचे महत्त्व सांगताना स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणतात, ‘मानवी जीवनावरील सर्वश्रेष्ठ वरदान, असे त्याचे वर्णन करता येईल. असे एक प्रयोगावर आधारलेले शास्त्र हिंदूंनी पूर्णत्वास नेले आहे. ते शास्त्र म्हणजे योगशास्त्र ! योगशास्त्र हे मनुष्याच्या आंतरिक शक्तीच्या संपूर्ण विकासाचे एक सर्वश्रेष्ठ शास्त्र आहे. ते वैयक्तिक अनुभवाचे शास्त्र आहे; म्हणून त्यात मतभेदाला जागा नाही. योगा करणार्‍या मनुष्याला आश्चर्यकारक इंद्रियातीत आणि उत्कृष्ट आनंद प्राप्त होतो. या अवस्थेला योगी ‘कैवल्य आनंद’ म्हणतात, कुणी ‘अद्वैती ब्रह्मानंद’, तर भक्त ‘प्रेमानंद’ म्हणतात. हा सर्वश्रेष्ठ आनंद प्राप्त करून घेणे, हे मनुष्याचे सर्वश्रेष्ठ ध्येय आहे.’

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना ध्येय पूर्ण करण्याची ऊर्जा योगातूनच मिळणे

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अत्यंत खडतर परिस्थितीतून जीवन जगावे लागले. अनेक संकटे आली, आयुष्यात अनेक धक्के बसले; परंतु सावरकर डगमगले नाहीत. धैर्याने त्यांनी सर्व प्रसंगाला तोंड दिले. अंदमानमध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगत असतांना नारळाच्या छिलक्या काढण्याचे काम केले आणि कोलू ओढला. अशाही परिस्थितीत योग उपासना नित्याची होती. संध्याकाळी कोठडीत ते योग सूत्रांचे चिंतन करत. अंदमानमध्ये मिळणारे निकृष्ट अन्न, दिली जाणारी अन्याय्य वागणूक, शारीरिक आणि मानसिक छळ हे सर्व सहन करत असतांना सावरकर यत्किंचित्ही विचलित झाले नाहीत. योग हेच त्याचे गमक आहे. आपल्या ध्येयाकडे पहात ते पूर्ण करण्याची ऊर्जा सावरकर यांना कुठून मिळाली ? निश्चितपणे योगाच्या मार्गावरच !

स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी योगाच्या पाठबळावरच निश्चय पूर्ण करणे

​स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे जीवन अगदी सुखात होते. त्यांच्या घरची श्रीमंती होती. तसेच त्यांच्याकडे परंपरेने आलेली सावकारकी होती; परंतु या सर्व भौतिकतेचा त्याग करून त्यांनी देशभक्तीचा मार्ग चालण्यास आरंभ केला. हा मार्ग खडतर होताच; परंतु अनेक कठीण प्रसंगांनाही त्यांना सामोरे जावे लागले. दोन जन्मठेपेची शिक्षा,

दोन्ही भावांना अटक, घरावर जप्ती, सर्व कुटुंबाचा छळ, पत्नीचा वियोग, सहकार्‍यांचे अटकसत्र, कारागृहात बाबाराव सावरकर यांचा आजार, अंदमानातून सुटल्यानंतरही रत्नागिरीतील स्थानबद्धता अशा अनेक विपरीत परिस्थितीमध्ये सावरकर चढणीचा मार्ग चढत गेले. जो मार्ग काट्याकुट्यांनी भरलेला होता, ज्यात अनंत धोके होते, यश मिळेल कि नाही, याची शाश्वती नव्हती, तरी मोठ्या धाडसाने ते पुढे जात राहीले. ते केवळ योगाच्या पाठबळावरच ! योगी एकदा केलेला निश्चय पूर्ण करतो.

​सावरकर यांनी म्हटले होते,

की घेतले व्रत न हे आम्ही अंधतेने ।
लब्ध प्रकाश इतिहास निसर्ग माने ।
जे दिव्य दाहक म्हणून असावयाचे ।
बुद्धाची वाण धरिले करि हे सतीचे ।

सावरकर यांच्या विचारांत आणि आचरणात योगाला दिलेले महत्त्व

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना कर्म, त्याग, समर्पण आणि संयम यांची शिकवण योगशास्त्रातून मिळाली होती. सावरकर यांच्या विचारांत आणि आचरणात योगाला किती महत्त्व होते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे हिंदु महासभेच्या ध्वजावर त्यांनी कृपाणासह कुंडलिनीलाही महत्त्वाचे स्थान दिले होते, म्हणजे आंतरिक शक्ती जागृत करणे आणि त्याद्वारे बाह्य शक्तीचा मुकाबला करणे, हेच त्यांच्या मनात होते, असे म्हणावे लागेल.

स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे योगेंद्र !

​स्वातंत्र्यविरांनी आत्मार्पणाचा निर्णय घेतला. या निर्णयापासून त्यांनी वेगळे व्हावे, बाजूला व्हावे किंवा निर्णय मागे घ्यावा म्हणून त्यांच्या सहकार्‍यांपासून ते घरातील मंडळींनीही त्यांना आग्रह केला; परंतु स्वातंत्र्यवीर म्हणजे योगेंद्र होते, निश्चयाचा महामेरू होते, ते आपल्या निर्णयावर ठाम राहीले आणि प्रयोपवेशनाच्या (मरण येण्यासाठी स्वतःहून अन्न आणि जल यांचा त्याग करणे) माध्यमातून एखाद्या महान योग्याप्रमाणे त्यांनी आपला देह पंचमहाभूतांच्या स्वाधीन केला. ते योगी होते; म्हणूनच इतक्या कठोरतेने वागले आणि अजय ठरले.’

– डॉ. लक्ष्मीकांत बाहेगव्हाणकर, बीड (२१.६.२०२०)

(साभार : दैनिक ‘सामना’)