कोरोना केंद्रातील लैंगिक अत्याचारप्रकरणी कोल्हापूर महापालिका आयुक्तांकडून चौकशी समितीची नियुक्ती !

कोल्हापूर – अनाथ मुलींचे संगोपन करणार्‍या कोल्हापुरातील एका संस्थेतील काही मुलींना कोरोनाचा संसर्ग झाल्यावर त्यांना महापालिकेच्या वतीने चालवण्यात येणार्‍या शिवाजी विद्यापीठ वसतीगृह क्रमांक ३ येथे उपचाराकरिता भरती करण्यात आले होते. त्या वेळी एका अल्पवयीन मुलीवर कोरोना केंद्रातील कंत्राटी परिचारक अंकुश पवार याने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी अंकुश पवार याच्यावर गुन्हा नोंद होऊन त्याला अटक झाली आहे. या प्रकरणी महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी स्वतंत्र चौकशी समितीची नेमणूक केली आहे.

ही समिती महापालिका कोरोना केंद्रात सुरक्षिततेविषयी काही त्रुटी होत्या का ? तेथे ‘सीसीटीव्ही’ होते कि नाही ? या प्रकाराला कोरोना केंद्रातील कुणी उत्तरदायी आहे का ? हा प्रकार घडला, तेव्हा तेथे महिला कर्मचार्‍यांची नेमणूक झाली होती कि नाही ? याची चौकशी करेल. महापालिका उपायुक्त शिल्पा दरेकर यांच्या समितीने अन्वेषणास प्रारंभ केला असून त्यांनी कोरोना केंद्रात जाऊन पहाणी केली आहे. या प्रकरणी चौकशी अहवाल आल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाणार असल्याचे आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी पत्रकारांना सांगितले.