भारतीय नौदलाकडून श्रीलंकेच्या मच्छीमारांना मारहाण करण्यात आल्याचे वृत्त खोटे ! – भारत

श्रीलंकेच्या नौदलाकडूनच भारतीय मच्छीमारांना मारहाण करण्यात आल्याच्या अनेक घटना आतापर्यंत घडल्या असल्याने भारतीय नौदलावर असा आरोप करणे म्हणजे श्रीलंकेच्या उलट्या बोंबाच होत !

कोलंबो (श्रीलंका) – श्रीलंकेच्या प्रसारमाध्यमांमध्ये भारतीय नौदलांकडून श्रीलंकेच्या मच्छीमारांंना मारहाण करण्याची वृत्ते प्रसिद्ध करण्यात आली आहेत. त्यावर श्रीलंकेतील भारतीय उच्चायुक्तालयाकडून स्पष्टीकरण देतांना ‘या खोट्या बातम्या असून अशी कोणतीही घटना घडलेली नाही’, असे म्हटले आहे. श्रीलंकेने याविषयी ‘चौकशी केल्यानंतर भारताशी चर्चा केली जाईल’, असे म्हटले आहे.

श्रीलंकेच्या १३ मच्छीमारांच्या एका स्थानिक गटाने दावा केला होता की, त्यांच्या  नौका ‘थुशान १’ आणि ‘थुशान २’ समुद्रात मासे पकडण्यासाठी गेल्या होत्या. ४ जून या दिवशी डिएगो गार्सिया या ठिकाणच्या आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये भारताच्या नौदलाने नौकेवरील मच्छीमारांना मारहाण केली. तसेच त्यांच्याकडे अमली पदार्थ मागितले.