सातारा, १६ जून (वार्ता.) – महापूरातून वाचण्यासाठी कराड आणि पाटण तालुक्यातील विविध गावांच्या संरक्षक भिंतींसाठी शासनाने ५ कोटी ४३ लाख ८२ सहस्र रुपये निधी संमत केला होता. संरक्षक भिंतींसाठी २ कोटी ३८ लाख २८ सहस्र रुपयांचा व्यय अपेक्षित आहे. त्यामुळे उर्वरित ३ कोटी ५ लाख ५४ सहस्र रुपये पडून रहाणार असल्याने त्यातील १ कोटी रुपये निधी पूररेषा निश्चितीच्या कामासाठी वळवण्याचा निर्णय जलसंपदा अधिकार्यांनी घेतला आहे. जलसंपदा अधिकार्यांच्या या निर्णयामुळे कराड आणि पाटण तालुक्यावर अन्याय होत असल्यामुळे हा निधी वळवू नये, असे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले आहे.
२० वर्षांपासून संरक्षक भिंतींचा विषय प्रलंबित आहे. आता शासकीय निधी संमत झाला असूनही अधिकार्यांच्या मनमानी कारभारामुळे गावावर महापूराची टांगती तलवार कायम आहे. प्रतिवर्षी कराड आणि पाटण तालुक्यातील ८१ गावे पूरग्रस्त होतात. तरीही अद्याप तेथे कोणतीही उपाययोजना केली गेलेली नाही. कराड तालुक्यातील केसे, साजूर, तांबवे आणि पश्चिम सुपने, तर पाटण तालुक्यातील मंद्रुळ हवेली, नेरळे आणि गिरेवाडी या गावांचा समावेश आहे.