|
सांगली, १५ जून (वार्ता.) – सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रात २० सहस्र भटकी कुत्री आणि अन्य प्राणी आहेत. ही भटकी कुत्री दिवसेंदिवस हिंसक बनत आहेत. काही दिवसांपूर्वी या कुत्र्यांनी आरोग्य विभागाच्या कर्मचार्यांवर आक्रमण केले होते. माझ्या प्रभागात कुत्र्यांनी घोड्यावर आक्रमण करून त्याला घायाळ केले होते. नागरिकांकडून नगरसेवकांकडे वारंवार या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जात आहे; मात्र महापालिकेची यंत्रणा सक्षम नसल्याने नगरसेवकांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. तरी या कुत्र्यांना पकडून महापालिकेच्या भूमीवर भटक्या कुत्र्यांसाठी कोडवाड्याची निर्मिती करावी, अशा मागणीचे निवेदन भाजप नगरसेविका (सौ.) स्वाती शिंदे यांनी महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांना दिले आहे. (भटक्या कुत्र्यांची समस्या सर्व यंत्रणा हाताशी असलेल्या महापालिका प्रशासनाच्या लक्षात येत नाही कि प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे ? – संपादक)
महापालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोंडवाड्याच्या भूमीची निश्चिती करून त्यासाठी अंदाजपत्रक सिद्ध करावे. महापालिकेकडे निधी उपलब्ध नसल्यास जिल्हा नियोजन समितीमधून निधीची मागणी करावी. भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी आता महापालिकेने तात्काळ पावले उचलण्याची आवश्यकता आहे. या वेळी नगरसेविका गितांजली ढोपे-पाटील, नगरसेविका सविता मदने, नगरसेविका उर्मिला बेलवलकर उपस्थित होत्या.