‘डी.एन्.ए.’ चाचणीद्वारे ठरणार अपहरण केलेल्या बाळाची आई : संशयित महिलेला ५ दिवसांची कोठडी

गोमेकॉतून १ मासाच्या अर्भकाचे अपहरण केल्याचे प्रकरण

‘मुलगाच हवा’, या हव्यासापोटी समाज किती खालच्या स्तराला जाऊ शकतो, याचे हे उदाहरण आहे ! या समस्या सोडवण्यासाठी मोठ्या प्रमाणात जागृती होणे आवश्यक !

पणजी, १३ जून (वार्ता.) – बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या (गोमेकॉच्या) आवारातून अपहरण केलेल्या १ मासाच्या बाळाचा शोध लावण्यास पोलिसांना यश आले आहे. संशयित महिला विश्रांती गावस हिने बाळ चोरल्याची स्वीकृती दिली आहे. बाळाच्या आईने बाळाची ओळख पटवली आहे; मात्र कायद्याच्या चौकटीत बाळाची आई ठरवण्यासाठी गोमेकॉ रुग्णालयात १४ जून या दिवशी संशयित महिला, तसेच बाळासह त्याचे पालक यांची ‘डी.एन्.ए.’ चाचणी करण्यात येणार आहे. न्यायालयात पुरावा सुपुर्द करण्यासाठी हा महत्त्वाचा दुवा ठरणार आहे, अशी माहिती आगशी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय राणे यांनी दिली आहे. पणजी येथील प्रथम श्रेणी न्यायालयाने संशयित विश्रांती गावस हिला ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

पुत्र हव्यासापोटीच बाळाला पळवले !

पाठोपाठ ४ मुली झाल्याने वंशाला दिवा हवा, यासाठी संशयित विश्रांती गावस हिने स्वत:च हे षड्यंत्र रचून गोमेकॉतून बाळाचे अपहरण केले. ही माहिती संशयित महिलेने पोलिसांना दिलेल्या जबानीतून उघड झाली आहे. या संपूर्ण प्रकरणात तिने स्वत:च्या पतीला अंधारात ठेवून हा नाट्यमय प्रकार घडवून आणला. संशयित विश्रांती गावस हिने काही मासांपूर्वी हे षड्यंत्र रचले. प्रथम तिने आपण गरोदर असल्याचे आणि नंतर प्रसूती होऊन मुलगा झाल्याचे पतीला सांगितले; मात्र कोरोना महामारीमुळे गोमेकॉच्या कक्षात (वार्डमध्ये) कोणालाही घेतले जात नसल्याने ‘बाळाला पहायला कुणी येऊ नये’, असे पती आणि कुटुंबातील अन्य सदस्यांना सांगितले. यामुळे बाळाला पहायला कुणीही गेले नाही; मात्र काही जण गेले असता बाळ आतमध्ये असल्याचे सांगून तिने त्यांना फसवले. पोलिसांनी कह्यात घेतल्यानंतर संशयित महिलेने चोरलेल्या बाळावर दावा केला; मात्र पोलिसांनी प्रश्‍नांचा भडीमार केल्यावर तिने दुष्कृत्याची स्वीकृती दिली.

या अपहरण नाट्यानंतर उत्तर गोव्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि इतर पोलीस मिळून एकूण सुमारे २०० हून अधिक पोलीस कर्मचारी ११ जून ते १२ जून या दिवशी सायंकाळपर्यंत अविरतपणे महिलेचा शोध घेत होते. ‘सीसीटीव्ही फूटेज’ सामाजिक माध्यमांत प्रसारित केल्याने पोलिसांना संशयित महिलेला शोधण्याचे मोठे आव्हान पेलणे शक्य झाले.

पालकांनी सावधगिरी बाळगण्याचे पोलिसांचे आवाहन

‘मुले पळवणार्‍या टोळ्या कार्यरत आहेत. पालकांनी लहान मुलांना एकटे सोडणे धोकादायक आहे. लहान मुले समवेत असतांना पालकांनी अनोळखी व्यक्तींपासून सावध रहाण्याची आवश्यकता आहे. मुलांना अनोळखी व्यक्तीकडे सोपवू नये आणि सावध रहावे’, असे आवाहन गोवा पोलिसांनी पालकांना केले आहे.